पुणे : मुलांच्या गटात चेतक स्पोर्ट्स संघ, बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशन, भैरवनाथ कबड्डी संघानी अनुक्रमे सरस्वती क्रीडा संस्था, महाराणा मंचर व राकेशाभाऊ घुले या संघाना पराभूत करताना करताना कै. प्रकाश (बापू) सणस यांच्या स्मरणार्थ, सरस्वती क्रीडा संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या खुल्या गटाच्या जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
नातूबाग येथील मैदानावर सुरु असलेल्या स्पर्धेच्या मुलांच्या गटात चेतक स्पोर्ट्स संघाने सरस्वती क्रीडा संस्था संघाला ३६-१७ असे पराभूत करतना स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला चेतक स्पोर्ट्स संघाने २०-७ अशी आघाडी घेतली होती. चेतक स्पोर्ट्स संघाकडून स्वप्नील बालवडकर, समीर पोकळे व अक्षय बोडके यांनी दमदार चढाया करताना संघाला विजय मिळवून दिला. सरस्वती संघाकडून शुभम रेणुसे व तन्मय चव्हाण यांनी दिलेली लढत अपुरी ठरली.
मुलांच्या गटात बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशन संघाने महाराणा मंचर संघाला ९-६ असे पराभूत करताना स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला बाबुराव चांदेरे संघाने ४-२ अशी महत्वपूर्ण 2 गुणांची आघाडी घेतली होती. सुरेद्र कडलगे व सचिन पाटील यांनी सुरेख खेळ करताना संघाला विजय मिळवून दिला. पराभूत संघाकडून आदित्य शिंदेने दिलेली लढत अपुरी ठरली.
मुलांच्या गटात भैरवनाथ कबड्डी संघाने राकेशभाऊ घुले संघाला ३१-१४ असे १७ गुणांनी पराभूत करताना स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. भैरवनाथ संघाने मध्यंतराला १५-१० अशी ५ गुणांची आघाडी घेतली होती. निलेश काळभोर व जितेंद्र शिंदे यांनी दमदार चढाया करताना संघाचा गुणफलक हलता ठेवला. त्याला सनी पवार व सोहम मुनगल यांनी पकडी करताना सुरेख साथ दिली. पराभूत संघाकडून गौरव तापकीर, विशाल ताटे व अभिमन्यू गावडे यांनी दिलेली लढत अपुरी ठरली.
मुलींच्या गटाच्या लढतीत राजमाता जिजाऊ संघाने क्रीडा कला विकास प्रकल्प संघाला ४६-१७ असे ३९ गुणांनी पराभूत केले. मध्यंतराला राजमाता जिजाऊ संघाने २३-९ अशी आघाडी घेतली होती. सायली केरीपाळे, अंकिता जगताप, ऋतुजा निगडे यांनी दमदार खेळ करताना संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पराभूत क्रीडा कला विकास प्रकल्प संघाकडून मनीषा राठोड व भूमिका गोरे यांनी लढत दिली.
तत्पूर्वी काल रात्री उशीरा झालेल्या मुलींच्या गटाच्या लढतीमध्ये आकांक्षा कला क्रीडा संघ व जागृती प्रतिष्ठाण यांच्या दरम्यान झालेली लढत बरोबरीत राहिली. मध्यंतराला आकांक्षा संघाने १७-१५ अशी दोन गुणांची आघाडी होती. आकांक्षा संघाकडून विद्या जगताप, रसिका जाधव व संजना दळवी यांनी तर जागृती संघाकडून तन्वी लोहार, साक्षी मसुरकर व कृतिका तळेकर यांनी दमदार खेळाचे प्रदर्शन केले.
मुलींच्या गटाच्या दुसऱ्या लढतीत राजा शिवछत्रपती संघाने द्रोणा स्पोर्ट्स क्लब संघावर २६-१४ अशी मात केली. मध्यंतराला राजा शिवछत्रपती संघाने १२-८ अशी आघाडी घेतली होती. यात राजा शिवछत्रपती संघाकडून सिद्धी मराठे, रिद्धी मराठे यांनी आक्रमक चढाया करताना तर, अंजली मुळेने पकडी करताना संघाला विजय मिळवून दिला. पराभूत द्रोणा स्पोर्ट्स संघाकडून श्वेता माने व अपेक्षा किखे यांनी चांगली लढत दिली. परंतू त्या संघाला पराजायापासून वाचवू शकल्या नाहीत.