आंबेगाव : मंचर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या परराज्यातील टोळीला मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याजवळून १३ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. घोडेगाव न्यायालयाने या चार जणांना दहा दिवसांची पोलिस कोठडी दिल्याची माहिती खेडचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल मांडवे यांनी दिली आहे.
अलमसिंग ईस्तो बामनिया (वय ३१, रा. करवट), अवलसिंग रामसिंग भुरिया (वय ५०, रा. देवधा), चमसिंग बदरू बामनिया (वय ३९, रा. छडावद), करणसिंग कालूसिंग भुरिया (वय ३८, रा. घोडदल्या, ता. कुक्षी, जि. धार) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
मंचरमधील एस कॉर्नर येथील लक्ष्मीपूजन सोसायटीत चोरट्यांनी तीन बंद सदनिका फोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम अशी एकूण ७ लाख ७२ हजार रुपयांची घरफोडी केली होती. याबाबत लक्ष्मण अरुण दातखिळे यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. याबाबत मांडवे यांनी तपास पथकाची नेमणूक केली होती.
या पथकातील सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर व त्यांच्या सहकाऱ्यांना सदरचा गुन्हा मध्य प्रदेशातील आरोपींनी केल्याचे समजले. सदर आरोपी कार (एमएच १३ झेडडी ७८५६) मधून खेडमार्गे भीमाशंकर येथे जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले असून त्यांना घोडेगाव न्यायालयात हजर केले असता १० दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. सदर आरोपींनी मंचर ठाण्याच्या हद्दीत सहा, वडगाव मावळ, भोर, सासवड, पौंड पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक गुन्हा केल्याचे कबूल केले. सदर गुन्ह्यामधील चोरी केलेले सोने-चांदीचे दागिने व रोख मध्य प्रदेश येथे ठेवली असल्याचे आरोपींनी सांगितले.
सहायक पोलिस निरीक्षक बडगुजर, हवालदार संजय नाडेकर, अंमलदार अजित पवार, योगेश रोडे, हनुमंत ढोबळे यांनी मध्य प्रदेशात जाऊन ८ लाख २० हजार रुपयांचे सोने- चांदीचे दागिने, पाच लाखांची कार असा १३ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पूढील तपास पोलीस करत आहेत.