लोणी काळभोर: लोकशाही प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी होण्याचे सामर्थ्य मिडियामध्ये आहे. माध्यमं नागरिकांना अचूक आणि निःपक्षपाती माहिती प्रदान करतात. आधुनिक माहितीच्या युगात लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून प्रसार माध्यमे महत्त्वाची भूमिका बजावतात. यामागे सर्वात महत्वाचा घटक म्हणून पत्रकारांचे बहुमुल्य योगदान असते. त्यामुळे समाजात काम करणाऱ्या पत्रकारांचाही सत्कार केला पाहिजे. ही सामाजिक बांधिलकी जोपासून लोकमंगल बँकेतर्फे पत्रकारांचा विशेष सन्मान करण्यात आला आहे.
पुण्यात लोकमंगल नागरी सह पतसंस्था मर्यादित सोलापूर या बँकेच्या पुणे शाखेत सोमवारी (ता.6) पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पुणे विभागाचे सल्लागार माणिकराव शेळके यांच्या हस्ते प्रिंट व डिजिटल मिडिया पत्रकार संघटनेचे हवेली तालुकाध्यक्ष संदीप बोडके, प्रमोद गिरी, गंधाले, प्रयागा होगे व दत्तात्रेय कात्रे या पत्रकारांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, व पुष्प देऊन विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी हडपसर बँकेचे व्यवस्थापक अंकुश गायकवाड, पुणे शाखा सल्लागार शिवाजी माळी, बाळासाहेब नेवसे, मुबारक मनेर, मधुकर कवडे, सुरेखा कानकाटे, सुलभा साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अण्णासाहेब पाटील योजनेअंतर्गत कर्ज योजनेचे लाभार्थी खैरे यांना रिक्षाची चावी प्रदान करण्यात आली. तर आई पर्यटन योजनेअंतर्गत पवार यांना किया या गाडीची चावी देण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व सल्लागार व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुबारक मनेर यांनी केले. तर आभार कुणाल खरोटे यांनी मानले.