बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील मोठी बातमी समोर आली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. प्रतिक घुले, महेश सुदर्शन सांगळे, विष्णू चाटे याच्यासह सात आरोपींवर मोक्का (मकोका) लावण्यात आला आहे. बीड पोलिसांकडून सात आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. वाल्मिक कराड याच्यावर मोक्का लावण्यात आला नाही. वाल्मिक कराड याला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आले आहे.
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली होती. ९ डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर महिनाभरानंतरही आरोपींवर कारवाई होत नसल्याने राज्यात जनआक्रोश मोर्चे काढण्यात आले. बीड, धाराशिव, परभणी, पुणे आणि वाशिमसह राज्यभरात निदर्शने करण्यात आली होती. प्रशासनाकडून आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, असे सांगण्यात येत होते. आज सात आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे.
ते सात आरोपी कोण?
प्रतिक घुले, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, विष्णू चाटे, महेश केदार, कृष्णा आंधळे, जयराम चाटे या आरोपींवर पोलिसांनी मोक्का लावला आहे. वाल्मिक कराड याच्यावर मात्र मोक्का लावण्यात आलेला नाही. तो खंडणीच्या आरोपात अटक आहे, पोलिस त्याचा तपास करत आहेत.
कृष्णा आंधळे अजूनही फरारच?
संतोष देशमुख हत्या होऊन एक महिना उलटला आहे. पण, मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरारच आहे. याप्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आले आहे. फरार कृष्णा आंधळे याच्यावर पोलिसांनी मोक्का लावला आहे. कृष्णा आंधळेचा शोध घेण्यासाठी पोलिसांची दोन पथके तैणात करण्यात आली आहेत. कृष्णा आंधळे हा पोलिसांना चकवा देत आहे. आंधळे याची बँक खाते फ्रिज करण्यात आली आहेत, त्याशिवाय त्याच्या निकटवर्ती लोकांचीही चौकशी केली जात आहे.