लोणी काळभोर : थेऊर फाटा-केसनंद रस्त्यावरून पायी चाललेल्या विद्यार्थ्याला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. ही घटना थेऊर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील तारू वस्ती परिसरात असलेल्या एचपी पेट्रोल पंपाजवळ शुक्रवारी (ता.10) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात लोणी काळभोर येथील विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे.
सोमेश गुरुशांत मठ (वय-19, रा. माळीमळा, लोणी काळभोर, ता. हवेली) असे जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमेश मठ हा लोणी काळभोर परिसरातील एका विद्यालयात शिक्षण घेत आहे. तर त्याची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने तो पार्ट टाईम कामही करीत आहे. दरम्यान, सोमेश हा थेऊर येथे मित्राला भेटण्यासाठी चालला होता.
सोमेश मठ हा रस्त्यावरून पायी जात असताना त्याला अज्ञात वाहनाने थेऊर येथील तारू वस्ती परिसरात असलेल्या पेट्रोल पंपाशेजारी जोरदार धडक दिली. या अपघातात सोमेश मठ हा गंभीर जखमी झाला होता. नागरिकांनी सोमेशला लोणी काळभोर (ता. हवेली) येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती तेथील डॉक्टरांनी सोमेशच्या नातेवाईकांना दिली. त्यानंतर सोमेशचे नातेवाईकांनी मदतीसाठी तत्काळ लोणी काळभोरचे माजी उपसरपंच राजेंद्र काळभोर यांच्याशी संपर्क साधला.
दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच, राजेंद्र काळभोर हे सोमेशला मदत करण्यासाठी तत्काळ विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. तेव्हा सोमेशची प्रकृती गंभीर असल्याने, त्याला पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांनतर सोमेशला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र सोमेशची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार होणे आवश्यक होते. तसेच व्हेंटिलेटरची गरज होती. परंतु, हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचारासाठी जागा शिल्लक नाही. त्यामुळे त्याच्यावर सध्या सामान्य विभागात (जनरल वार्ड) उपचार सुरु आहेत. तसेच सोमेशला लवकरच अतिदक्षता विभागात शिफ्ट करण्यात येणार आहे. असे ससूनच्या डॉक्टरांनी सांगितले आहे. अशी माहिती काळभोर यांनी दिली.