पुणे प्राईम न्यूज डेस्क: बॉलीवूड अभिनेता व आमिर खानचा भाचा इमरान खानने २०११ मध्ये गर्लफ्रेंड अवंतिका मलिकशी लग्न केलं होतं. पण २०१९ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता. आता एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये अवंतिकाने घटस्फोटाचा काळ तिच्या आयुष्यातील सर्वांत आव्हानात्मक काळ होता याबद्दल खुलासा केला आहे. या पोस्ट मध्ये इमरान खान किंवा त्यांच्या घटस्फोटाचा थेट उल्लेख न करता तिने तिचा ज्या वर्षी घटस्फोट झाला, त्या २०१९ चा उल्लेख केला आहे.
अवंतिका मलिकने पोस्टमध्ये पुढे लिहिलं, “इतरांची काळजी घ्या. काही लोकांपासून दूर व्हा. स्वतःला वेळ द्या. तुम्ही जसे आहात तसे राहा. तुम्हाला जसं प्रेम करायचंय तसं करा. लोकांवर जाणीवपूर्वक मनापासून आणि कोणत्यातरी हेतूने प्रेम करा. लोकांना माफ करा. शांत राहा, उत्सुक राहा, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आशावादी राहा. आशा सोडू नका.”
अवंतिका मलिकने कॅप्शनमध्ये २०१९ मध्ये शेवटच्या भेटलेल्या दोन मैत्रिणींना नुकतेच भेटल्यानंतर तिच्या डोक्यात आलेले विचार लिहिले आहेत. “त्यांनी मला शेवटचं २०१९ मध्ये पाहिले होतं, त्या वर्षी मी तुटले आणि मुक्त झाले आणि नंतर त्यांनी मला आता पाहिलं. त्यांचं म्हणणं असं होतं की अखेर खरी मी त्यांना दिसले. त्यांनी पाहिलेला आनंद माझ्या डोळ्यात, माझ्या चेहऱ्यावर एक चमक आणतो आणि मला माहित होतं की त्या मला खरं सांगत आहेत. पण त्यांनी मला सांगितलेली सर्वात चांगली गोष्ट म्हणजे मी खऱ्या अर्थाने ‘जगतेय’.
मैत्रिणींच्या निर्णयामुळे ती तिच्या आयुष्यातील या टप्प्यावर कशी आली याचा विचार करायला लावला, असं अवंतिका म्हणते. “मला माहीत आहे की मी नेहमीच आशावादी होते, त्यामुळे हे घडलं. आयुष्यात सगळीकडे अंधार असताना मी स्वतःला आठवण करून दिली की जर मी फक्त माझ्यातील प्रेम इतरांना देण्यावर लक्ष केंद्रित केले तर जग उदारतेने ते मला परत करेल. जे मनात आहे तेच बाहेर आहे,” असं अवंतिकाने इंस्टाग्राम पोस्ट मध्ये लिहिलं आहे.
इमरान खान व अवंतिका मलिक लहानपणापासून मित्र होते आणि नंतर त्यांनी २०११ मध्ये लग्न केलं. आठ वर्षांच्या संसारानंतर २०१९ मध्ये ते विभक्त झाले. या दोघांना इमारा नावाची मुलगी आहे. इमरान सध्या लेखा वॉशिंग्टनबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे.
शुक्रवारी अवंतिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लोकांना माफ करण्याबद्दल एक पोस्ट केली. तिने पोस्टमध्ये लिहिलं, आपण जेवढे दिवस जगणार आहोत तो काही फार मोठा काळ नाही, हे सत्य आहे. त्यामुळे जर तुम्हाला आयुष्य चांगलं जगायची एकही संधी असेल तर ती सोडू नका. तुम्ही इथे जेवढ्या काळासाठी आहात, त्यात ज्या गोष्टी करू शकता त्या सगळ्या करा.