पिंपरी : पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून पाच जणांच्या टोळक्याने एका तरुणावर चाकूने वार करत बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. तसेच, परिसरात दहशत निर्माण केल्याची घटना रहाटणी येथून समोर आली आहे.
मन्सुर मेहबुब शेख (वय २४, रा. काळेवाडी) यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी, सुरज प्रकाश पिंगळे (वय २४, रा. रहाटणी) व शुभम अभिमान जाधव (रा. गुजरनगर, थेरगाव) या दोघांना अटक केली आहे. तर, तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मन्सुर व सुरज यांच्यामध्ये एक महिन्यापूर्वी वाद झाला होता. बुधवारी मन्सुर व त्यांचा मित्र प्रसाद चव्हाण उभे असताना त्यांना सुरज याने बोलावून घेतले. त्यावेळी मागच्या भांडणाचा राग मनात धरून सुरजने इतर साथीदारांना बोलावत मन्सुर यांना मारहाण केली. ‘तू काय इथला भाई झालाय का, मी इथला भाई आहे, माझी दहशत माहित नाही का तुला, असे म्हणत मन्सुरवर चाकूने वार केले. तर, सुरजच्या साथीदाराने हातातील कोयत्याने वार केला. मात्र, तो मन्सुर यांनी चुकवला. त्यांचा मित्र प्रसाद वाचवण्यासाठी आला असता त्याला देखील मारहाण केली.