बीड : संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणामुळे वाल्मिक कराड याचं नाव चर्चेत असून खंडणीच्या आरोपाखाली वाल्मिक कराड सध्या पोलीस कोठडीत आहे. वाल्मिक कराड याचे अनेक कारनामे बाहेर आले आहेत. त्यातच आता वाल्मिक कराड याच्या मुलावरही गंभीर आरोप करण्यात आला आहे. बंदुकीचा धाक दाखवत प्लॉट आणि सोनं ताब्यात घेतल्याचा आरोप वाल्मिक कराड याच्या मुलावर करण्यात आला आहे. पिडीत महिलेने सोलापूर कोर्टात वाल्मिक कराड याच्या मुलाविरोधात धाव घेतली आहे.
नेमकं प्रकरण काय?
वाल्मिक कराड याचा मुलगा संतोष कराड अडचणीत सापडला आहे. वडिलानंतर आता मुलाचे पाय खोलात गेल्याची चर्चा सुरु झाली आहे. वाल्मिक कराडच्या मुलावर सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात खासगी फिर्याद दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. सुशील कराडने त्याच्या मॅनेजरच्या घरात घुसून रिव्हॉल्वरचा धाक दाखवून दोन बल्कर ट्रक, दोन कार, परळीतील प्लॉट आणि सोने बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.
सुशील वाल्मीक कराडसह त्याचे मित्र अनिल मुंडे आणि गोपी गंजेवार यांच्याविरुद्ध ही खासगी फिर्याद दाखल करून घेण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली आहे. मॅनेजरच्या पत्नीने याबाबत सोलापुरातील एमआयडीसी पोलीस स्टेशन, सोलापूर पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक बीड यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. मात्र त्याची अद्याप दखल घेतली गेली नसल्याचे समोर येत आहे.
पोलिसांनी तक्रार न घेतल्यामुळे मॅनेजरच्या पत्नीने कोर्टा धाव घेतली आहे. पीडित महिलेने सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली आहे. त्यावर आरोपींनी त्यांचे म्हणणे दाखल केले असून 13 जानेवारी रोजी याबाबत सुनावणी होणार आहे. सुशील कराडवर केलेल्या आरोपबाबत सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालय काय निर्णय देते? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.