नवी मुंबई: उलवे भागात राहणाऱ्या सुहास खंडू जोगदंड (२८) या तरुणाने २७ वर्षीय तरुणी सोबत प्रेमसंबंध निर्माण करून दारूच्या नशेत जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित तरुणीचे दुसऱ्या तरुणासोबत लग्न ठरवल्यानंतर आरोपी सुहास याने त्याच्यासोबत असलेले पीडित तरुणीचे खाजगी व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला त्रास देण्यास सुरुवात केल्याने पीडित तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली. वाशी पोलिसांनी या आरोपी तरुणाविरोधात बलात्कारासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.
या प्रकरणातील २७ वर्षीय पीडित तरुणी मुंबईतील वडाळा भागात राहण्यास असून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी सुहास खंडू जोगंदड हा उलवे परिसरात राहण्यास आहे. २०१७ मध्ये हे दोघेही एकत्र कामाला असताना त्यांच्यामध्ये मैत्री झाली होती. त्यानंतर त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाल्यानंतर आरोपी सुहास जोगदंड याने पीडित तरुणीला दारू पाजली. त्यावेळी पीडित तरुणीला नशेत असताना त्याने वाशीतील संकल्प लॉजवर नेऊन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर देखील आरोपी सुहास जोगदंड याने पीडित तरुणीवर विविध ठिकाणी जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले.
दरम्यान, पीडित तरुणीने आरोपी सुहास सोबत असलेले प्रेमसंबंध तोडून दुसऱ्या तरुणासोबत विवाहाची तयारी केल्यानंतर आरोपी सुहास याने पीडित तरुणीला दोघांचे खाजगी व्हिडीओ पाठवण्याची धमकी देऊन तिला शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. पीडित तरुणीने आरोपी सुहासला प्रतिसाद न दिल्याने सुहासने ५ जानेवारी रोजी पीडित तरुणी राहत असलेल्या घरासमोर जाऊन तिचे खाजगी व्हिडीओ सर्वांना पाठवण्याची धमकी दिली. तसेच त्याच्यासोबत राहण्यासाठी जबरदस्ती केली; अन्यथा तिचा जीव घेण्याची धमकी दिली.
या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या पीडित तरुणीने वडाळा टीटी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार, वडाळा टीटी पोलिसांनी आरोपी सुहास जोगदंड याच्याविरोधात बलात्कारासह धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच हा गुन्हा पुढील तपासासाठी वाशी पोलिसांकडे वर्ग केला आहे. त्यानुसार, या गुन्ह्याचां पुढील तपास वाशी पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे.