नागपूर : मैत्रिणीला आयफोन गिफ्ट देण्यासाठी घरफोडी करणाऱ्या दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ही घटना कळमना हद्दीत घडली. पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा अवघ्या चोवीस तासांत उघड केला आहे. दिघेश्वर किसनलाल रहांगडाले (३६, रा. कामनानगर, कामठी रोड), असे फिर्यादीचे नाव आहे. सोमवार, ६ जानेवारी रोजी दुपारी ३ ते बुधवार, ८ जानेवारी रोजी दुपारी १२.३० यादरम्यान दिघेश्वर रहांगडाले हे त्यांच्या राहत्या घराला कुलूप लावून परिवारासह सासऱ्याच्या गावाला गेले होते.
यादरम्यान अज्ञात आरोपींनी त्यांच्या घराच्या मुख्य दाराचे कडी-कोयंडा कुलूप तोडून आत प्रवेश केला. यानंतर आरोपींनी बेडरूममधील कपाटात ठेवलेले रोख १ लाख ४४ हजार रुपये चोरून नेले, अशी तक्रार फिर्यादी दिघेश्वर यांनी दिली होती. या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तपासादरम्यान कळमना पोलिसांच्या तपास पथकाने पेट्रोलिंगदरम्यान संशयितरीत्या रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या दोन विधिसंघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. विधिसंघर्षग्रस्त बालकांच्या ताव्यातून रोख रकमेपैकी १ लाख ४३ हजार २४० रुपये रोख जप्त करण्यात आले. उर्वरित रक्कम त्यांनी खाण्यापिण्यात खर्च केल्याचे सांगितले.
तसेच त्यांनी मैत्रिणीला आयफोन गिफ्ट देण्यासाठी चोरी केल्याचे सांगितले. कळमना पोलिसांनी चोवीस तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, सहपोलीस आयुक्त निसार तांबोळी, उत्तर विभागाचे अपर पोलीस आयुक्त प्रमोद शेवाळे, पोलीस उपायुक्त निकेतन कदम, कामठी विभागाचे सहा. पोलीस आयुक्त विशाल क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि, प्रवीण काळे, पोनि. सतीश आडे, सफौ. दीपक धानोरकर तसेच रविकुमार शाहू, प्रदीप पवार, संतोष पांडे, मंगेश लोही व संदीप ढाले यांनी केली.