कोल्हापूर : चंदगड तालुक्यातील कोवाड येथील एका बँकेचे एटीएम मशीन फोडून १८ लाखांची रोकड लंपास केली होती. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस करत होते. पोलिसांनी हे एटीएम फोडणाऱ्या चौघा परप्रांतीय संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे समजते. त्यांच्याकडे पोलिसांची कसून चौकशी सुरू आहे. दोन दिवसांत हा गुन्हा उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
४ जानेवारी रोजी चंदगड तालुक्यातील कोवाड गावातः एसबीआय बँकेचे एटीएम मशीन चोरट्यांनी फोडून त्यातील १८ लाख रुपयांची रोकड लंपास केली होती. या प्रकरणी चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. बँकचे मॅनेजर आशीष हरिशचंद्र रोकडे (वय ४१, रा. सुंदरनगर, नेसरी, ता. गडहिंग्जल, मूळ भंडारा) यांनी फिर्याद दिली होती.
मॅनेजर रोकडे यांनी दि. ४ रोजी दुपारी एटीएमध्ये २१ लाख रुपयांची रोकड भरणा केली होती. त्याच दिवशी संध्याकाळी अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने हे एटीएम मशीन फोडून त्यातील १८ लाख रुपयांची रोकड चोरून नेली. या प्रकरणाचा तपास करताना स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी समजलेल्या माहितीच्या आधारे पथक पाठवले. संशयित परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांनी ही चोरी केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. याबाबत त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे.