पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पुण्यातील विशेष न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला आहे. या खटल्याच्या सुनावणीसाठी राहूल गांधींनी उपस्थित रहावे यासाठी त्यांना न्यायालयाकडून वारंवार समन्स बजावण्यात आले होते. अखेर आज राहुल गांधी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर झाले होते. त्यानंतर पुणे सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना जामीन मंजुर केला आहे.
या खटल्याची पुढची सुनावणी 18 फेब्रुवारी रोजी होणार आहे. खासदार-आमदारांविरोधातील दाव्यांची सुनावणी घेणाऱ्या विशेष न्यायाधीश अमोल शिंदे यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. राहुल गांधी यांना हजर राहण्याबाबत शुक्रवारी (१० जानेवारी) तारीख देण्यात आली होती. त्यानुसार राहुल गांधी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर हजर झाले.
दरम्यान, राहुल गांधी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दलच्या वक्तव्याचा वाद सातत्याने माध्यमांत झळकतो. राहुल गांधींनी माफीवीर असे म्हणत सावरकर यांचा अवमान केल्याचा आरोप करत भाजपने राहुल गांधींविरुद्ध आंदोलनही केले होते. तर, भारत जोडो यात्रेतही त्यांनी सावरकरांचे नाव घेतल्याने वाद निर्माण झाला होता.
याप्रकरणी राहुल गांधींना पुण्यातील शिवाजीनगर न्यायालायात 19 ऑगस्ट रोजी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. याप्रकरणी गांधी यांनी न्यायालयात येऊन त्यांची बाजू मांडावी, असे न्यायालयाने म्हटले होते. मात्र, राहुल गांधी अनुपस्थितीत राहिल्यामुळे कोर्टाने त्यांना समन्स बजावत पुन्हा न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार त्यांनी आज ऑनलाईन उपस्थिती दर्शवत आपली बाजू मांडली आहे.
नेमकं प्रकरण काय?
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी इंग्लंडमधील एका कार्यक्रमादरम्यान सावरकारांवर टीका केली होती. सावरकरांचे पाच सहा मित्र एका मुस्लीम व्यक्तीला मारहाण करत होते आणि ते पाहून सावरकरांना आनंद होत होता, असं सावरकरांनी त्यांच्या पुस्तकात लिहून ठेवल्याचा दावा राहूल गांधी यांनी केला होता. सात्यकी सावरकार यांनी राहुल गांधींच्या या वक्तव्याच्या विरुद्ध न्यायालयात खटला दाखल केला आहे. त्या अनुषंगाने राहुल गांधी आज न्यायालयात ऑनलाइन हजर झाले असता, न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.