छत्रपती संभाजीनगर: एक्स्प्रेस रेल्वेसमोर उडी मारून एकाने आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (दि.९) सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास मुकुंदवाडी रेल्वे स्थानकाजवळ घडली. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. अशोक लक्ष्मण सुरवसे (४९, रा. विशालनगर, गारखेडा) असे मृताचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. सुरवसे हे एका कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून कामाला होते. गुरुवारी नाईट ड्यूटी करून ते घरी आले होते. मात्र, सकाळी साडेसहाच्या सुमारास ते मॉर्निंग वॉकसाठी घरातून बाहेर पडले. त्यांनी नेहमीप्रमाणे एका टपरीवर चहा घेतल्याचेही पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, सुरवसे यांनी सकाळी मुलाला फोन करून मी रेल्वेस्टेशनकडे जात असल्याचे सांगितले. मुलाने तुम्ही घरी या मला कामावर जायचे आहे, असे सांगितले. मुलाने त्यांना पुन्हा संपर्क केला, मात्र संपर्क झाला नाही. त्यानंतर त्यांचा रेल्वेखाली मृत्यू झाल्याचे समजले. कुटुंबीयांनी धाव घेतली. मुकुंदवाडी पोलिसांनी कळविण्यात आले. सुरवसे यांना गंभीर जखमी अस्वस्थेत घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अधिक तपास हवालदार जी. के. कोंडके करीत आहेत.