नाशिक: गुंगीचे औषध देऊन एका स्कूलबस चालकाने शिक्षिकेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संशयिताने महिलेचे अश्लील फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अनैसर्गिक अत्याचार केल्याने पीडितेने पोलिसांत धावं घेतली आहे. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीनुसार संशयित बस चालकावर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला शरणपुर रोड परिसरातील एका शाळेत शिक्षिका म्हणून नोकरीला होती. त्याच शाळेत बसचालक असलेल्या एका २७ वर्षीय संशयिताने पीडितेशी ओळख निर्माण करून फोन नंबर मिळवून मेसेज करणे सुरू केले. एक दिवस संशयिताने घरी कोणी नसल्याची संधी साधत पीडितेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार करीत तिचे अश्लील फोटो काढले. त्याआधारे २०२३ पासून जानेवारी २०२५ या काळात पीडित शिक्षिकेला त्रास दिला. कामाच्या ठिकाणी पीडितेची बदनामी करीत तिला काम सोडण्यास भाग पाडले. फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेच्या इच्छेविरोधात अनेकदा अनैसर्गिक अत्याचार केला, अखेर पीडितेने पोलिसांत धाव घेत पोलिसांसमोर आपबिती कथन केली. त्यानुसार संशयिताविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक किरण रौंदळ अधिक तपास करीत आहेत.
‘लिव्ह इन रिलेशनशिप ‘मध्ये राहणाऱ्या महिलेस जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याच्या घटनेस काही तास होत नाही तोच शिक्षिकेवर अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आल्याने महिला सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महिला व मुलीची छेडछाड, विनयभंग, विविध प्रकारचे आमिष दाखवून अत्याचार असे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. याशिवाय चेन स्नॅचिंग, महाविद्यालयांच्या परिसरातील टवाळखोरांचा प्रश्नदेखील निर्माण झाला आहे.