सागर जगदाळे / भिगवण : पुरंदर तालुक्यातील भिवरी सारख्या ग्रामीण भागात राहून कु. अमृता दादासाहेब कटके हिने गोळा फेक या ताकदीच्या खेळात नैपुण्य मिळवत आपल्या यशाचा ठसा राष्ट्रीय पातळीवर उमटवला. रांची येथे झालेल्या 19 वर्षाखालील 68 व्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेत कु. अमृता दादासाहेब कटके हिला सुवर्ण पदक मिळाले आहे.
आई व वडील हे दोघेही पेशाने शिक्षक दांपत्य. दोघेही आपल्या कामात प्रामाणिक, आपल्या मुलीला देखील त्यांनी आपल्याच जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल केले. मुलगी अमृता ही अभ्यासाबरोबरच इतर कला कौशल्यात हुशार होतीच. पण तिची खेळातील आवड लक्षात घेऊन तिने खेळावरच लक्ष केंद्रित करावे, असं पालकांच्या लक्षात आले.
गोळाफेक यामध्ये असणारी तिची आवड लक्षात घेऊन वडील दादासाहेब व चुलते राहुल कटके यांनी तिचा सराव घेण्यास सुरुवात केली. पण गोळाफेक याचे कसब शिकवण्यात त्यांनाही अडचण येत होती. म्हणून त्यांनी या खेळात जागतिक नाव लौकिक मिळवलेले लखविंदर सिंग (हरियाणा) यांच्याकडे तिला प्रशिक्षणाला पाठवायचे ठरवले.
त्यांनी देखील अमृता हिच्यातील आवड व खेळाबद्दल असणारी जिद्द ओळखली. अमृता हिचा खेळातील सराव गुरु लखविंदर सिंग यांच्या देखरेखी खाली सुरू झाला. अमृता हिच्या सर्व खाण्या पिण्याची व तिच्या सोबत राहण्याची जबाबदारी तिच्या आजी आजोबांनी उचलली. मागील वर्षी हुकलेले सुवर्ण पदक तिने हार न मानता संयमाने व चिकाटीने सराव चालू ठेवून या वर्षी खेचूनच आणले.
या तिच्या यशाबबद्दल बोलताना गुरु लखविंदर सिंग म्हणाले की अमृता ही या यशाने हुरळून जाणारी नाहीये तर तिचे ध्येय या पेक्षा मोठे आहे. आणि तिच्या प्रयत्नाकडे पाहता ती नक्कीच जागतिक दर्जाची खेळाडू होईल. असा मला आत्मविश्वास आहे. मामा व शिक्षक असलेले विश्वजीत जगदाळे म्हणाले की, मुलगा व मुलगी असा भेद न मानता ज्या प्रमाणे तिचे कुटुंब तिच्या मागे उभे राहिले हे कौतुकास्पद आहे. तिच्या या यशात पूर्ण कुटुंबाचे योगदान आहे.