पिंपरी (पुणे): सिलिंडरमधील गॅसचे वजन कमी असल्याचा बहाणा करीत चार सराईत चोरट्यांनी गॅस वितरण कर्मचाऱ्यांना लुटले. या प्रकरणी सांगवी पोलिसांनी तपासचक्रे फिरवत बुधवारी (दि. ८) सराईत गुन्हेगारांना अटक केली. या प्रकरणी बागी जगमलराम बिष्णोई (वय ४०, रा. पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सोमनाथ प्रकाश पाटोळे (वय ३०, रा. सोळू, ता. खेड, जि. पुणे), हरिश्चंद्र रामचंद्र साळवी (वय २५), सोहम संजय खंडारे (वय २१) आणि जगदीश एकनाथ कंकाळे (वय २१, तिघेही रा. र्चहोली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी सोमनाथ प्रकाश पाटोळे याच्यावर पुणे शहर पोलीस, पुणे ग्रामीण पोलीस आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत तब्बल १७ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दि. १२ डिसेंबर २०२४ आणि ८ जानेवारी २०२५ या दिवशी नवी सांगवी येथे घडली. फिर्यादी विष्णोई हे गॅस सिलिंडरचा टेम्पो घेऊन चालले होते. बुधवारी दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारास ते कृष्णानगर येथे आले असता आरोपींनी त्यांचा टेम्पो अडविला. घरगुती गॅस सिलिंडरचे वजन वैध वजनापेक्षा कमी असल्याचे सांगून फिर्यादी यांना दमदाटी केली. तसेच प्रकरण मिटविण्यासाठी १ लाख रुपयांची मागणी केली. मात्र, त्यांनी पैसे देण्यास नकार दिला असता आरोपींनी त्यांना मारहाण करीत शर्टाच्या खिशातून पाच हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच १२ डिसेंबर रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास याच आरोपींनी सुनील भगवानराम बिष्णोई यांना याच कारणावरून धमकावून आरोपी सोहम खंडारे याच्या खात्यावर ५० हजार रुपये ऑनलाईन पाठविण्यास भाग पाडले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासचक्रे फिरवत आरोपींच्या मुसक्या आवळल्या. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.