पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका सेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना (पेन्शन) लागू करण्यात आली आहे. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी पदभरती जाहिरात किंवा शासन सेवेत १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. या प्रस्तावास प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.
पिंपरी येथील महापालिकेत प्रशासक सिंह यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक पार पडली. यावेळी विविध विषयांना त्यांनी मान्यता दिली. महापालिका हद्दीतील प्रभाग क्र. १० मध्ये मोरवाडी व इतर परिसरात पावसाळी गटारे स्वच्छ करणे, फुटपाथ विषयक कामे करणे. तसेच प्रभाग क्र. २८ रहाटणी येथील अंतर्गत रस्त्यांचे हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करणे, प्रभाग क्र. १६ मधील किवळे येथील मुख्य व अंतर्गत रस्त्यावरील स्थापत्य विषयक कामे तसेच प्रभाग क्र. १७ मधील विविध ठिकाणी आवश्यकतेनुसार स्थापत्य विषयक दुरुस्तीची कामे करण्याच्या प्रस्तावास मान्यता दिली.
नोंदणीकृत महिला बचत गटाला झोपडपट्टीतील सामूदायिक शौचालयाची साफसफाई आणि देखभालीचे काम देणे, नवी दिशा उपक्रम तसेच एसआरए प्रकल्पांतर्गत पुनर्वसन झालेल्या एचए. ग्राउंड येथील रहिवासी भागातील दैनंदिन कचरा गुलाबपुष्प उद्यान येथील शून्य कचरा प्रकल्पात प्रक्रिया करण्याच्या विषयास प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.