श्रीनगर: काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘इंडिया’ आघाडी ही केवळ लोकसभा निवडणुकीपुरतीच मर्यादित होती. आता ही आघाडी गुंडाळून टाकली पाहिजे, असा घरचा आहेर जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिला. ‘इंडिया’ आघाडीत समन्वयाचा अभाव आहे. या आघाडीकडे नेतृत्व व स्पष्ट ध्येय नाहीः गेल्या सात महिन्यांत एकदाही घटक पक्षांची एकही बैठक झालेली नाही, असे सांगत त्यांनी इंडिया आघाडीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी आघाडी ही केवळ लोकसभेपुरतीच होती, असे वक्तव्य केले. तसेच काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनीसुद्धा असेच मत व्यक्त करीत दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षासोबत हातमिळवणी न करता काँग्रेस पक्ष स्वतंत्ररीत्या जोरदार मोर्चेबांधणी करीत असल्याचे म्हटले आहे. याविषयी जम्मू येथे पत्रकारांनी विचारले असता मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ‘इंडिया’ आघाडी गुंडाळण्याचा सूर आळवला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीशी आमचे काहीही देणेघेणे नाही. तिथे ‘इंडिया’ आघाडीच्या समन्वयाविषयी मी काहीही भाष्य करणार नाही. भाजपचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी दिल्लीतील सत्तारूढ आम आदमी पक्ष (आप), काँग्रेस व इतर राजकीय पक्षांनी योग्य निर्णय घ्यावा, असे ओमर अब्दुल्ला म्हणाले.
दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर ‘इंडिया’ आघाडीतील सर्वच घटक पक्षांची बैठक बोलावण्यात यावी. पण जर ही आघाडी केवळ लोकसभा निवडणुकीपुरतीच होती तर ती आता समाप्त केली पाहिजे. आम्ही वेगवेगळे लढण्यास तयार आहोत. मात्र, विधानसभा निवडणुकीसाठी सुद्धा ‘इंडिया’ आघाडी असेल तर आपण सर्व जण एकत्र आले पाहिजे. वेळोवेळी बैठका झाल्या पाहिजे व सर्वांनी मिळून एकत्रितरीत्या काम केले पाहिजे, असेही ओमर अब्दुल्ला यांनी पुढे बोलताना नमूद केले.
दुसरीकडे, जम्मू-काश्मीरमधील प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही केंद्र सरकारसोबत मिळून काम करणार आहोत. केंद्र सरकारसोबत आम्हाला संघर्ष करायचा नाही, असे नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांनी स्पष्ट केले. ‘इंडिया’ आघाडी केवळ निवडणुका लढण्यासाठी नसून देशाला एकजूट ठेवत द्वेषाला पराभूत करणारी आहे, अशा शब्दांत त्यांनी ‘इंडिया’ आघाडीची पाठराखण केली.