पुणे : सौरऊर्जा, गांडूळखत प्रकल्प तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंग इत्यादी योजनांसाठी असणारी कर सवलत सुरू ठेवण्यासाठी पुन्हा नव्याने अर्ज करण्याच्या पालिकेच्या करसंकलन विभागाच्या परिपत्रकाबाबत माजी नगरसेवकांनी आक्षेप घेतल्यानंतर आता प्रशासनाने ‘यू टर्न’ घेतला आहे. आता प्रशासनाकडून ही सवलत नियमितपणे सुरू ठेवण्यात येणार आहे. ही सवलत कायमस्वरूपी सुरू ठेवावी, अशी मागणी माजी नगरसेवकांनी मिळकत कर प्रमुख माधव जगताप यांच्याकडे केली होती. माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर, प्रशांत बधे, सुहास कुलकर्णी यांनी याबाबतचे निवेदन दिले आहे.
पालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाकडे सवलतीसाठी अर्ज नव्याने करण्याची गरज नाही, असे शुद्धिपत्रक आता काढले आहे. पुणे महानगरपालिकेकडून सौरऊर्जा प्रकल्प, रेन वॉटर हार्वेस्टिंग करणाऱ्यांना करात सवलत दिली जात होती. मात्र, उत्पन्न वाढविण्यासाठी प्रशासनाकडून ही सवलत बंद करण्याचा निर्णय घेतला होता. थकबाकीची वसुली करण्याऐवजी चांगल्या सवलती बंद करण्याबाबत माजी नगरसेवकांनी आवाज उठविला होता.