बीड : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन हत्या करण्यात आली आहे. या घटनेला काल एक महिना पूर्ण झाला आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने या घटनेची स्वतंत्रपणे चौकशी करावी अशी मागणी खासदार बजरंग सोनावणे यांच्याकडून करण्यात आली आहे. त्यांनी या संदर्भात आयोगाचे सदस्य प्रियांक क्रानूगनो यांची भेट देखील घेतली आहे.
संतोष देशमुख यांची हत्या ९ डिसेंबर रोजी करण्यात आली होती. त्यांचा खून आणि त्यांच्या देहाची केलेली विटंबना ही माणूसकीला काळीमा फासणारी घटना असल्याचे बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी म्हटले आहे. या प्रकरणाची चौकशी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने करावी अशी मागणी सोनावणे यांच्याकडून करण्यात आली आहे. आयोगाने गुन्हा दाखल करुन चौकशीला सुरुवात होणार असल्याचेही बजरंग सोनवणे यांनी सांगितले आहे.
मस्साजोग प्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगात गुन्हा क्र. ३३/१३/५/२०२५ अन्वये गुन्हा दाखल करुन घेतला आहे, अशी माहिती खासदार बजरंग सोनावणे यांनी माध्यमांना दिली. दिल्लीहून बीडमध्ये आयोगाची टीम येणार आहे. राज्य सरकारकडून या प्रकरणाचा अहवाल मागवून मग तपास सुरु केला जाईल असे सांगितले जात आहे.
संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ राज्यभरात ठिकठिकाणी संताप व्यक्त केला जात आहे. अनेक जागी जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात येत आहे. आज (१० जानेवारी) जालन्यामध्ये मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या वतीन महाजनआक्रोश मोर्चा निघाला आहे. दोषींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात येत आहे.