पिंपरी : पिंपरी-चिंचवड येथून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. महिलेने चपलेने मारल्याचा बदला घेण्यासाठी स्वंयघोषीत भाईने त्याच्या साथीदारांच्या मदतीने महिलेच्या घरात घुसून तोडफोड, लुटमार केल्याची घटना घडली आहे. ही घटना ८ जानेवारी रोजी रात्री सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास भोसरी येथील बालाजीनगर झोपडपट्टी परिसरात घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच कोयता हवेत फिरवत परिसरात दहशत निर्माण केली आहे. या प्रकरणी महिलेने एमआयडीसी भोसरी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यावरून तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी फिर्यादी महिलेच्या बहिणीने आरोपीला चपलेने मारले होते. याचा राग आरोपीच्या मनात होता. बुधवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास फिर्यादी महिला या त्यांच्या राहत्या घरी झोपल्या होत्या. त्यावेळी आरोपी त्याच्या साथीदारांसह तिथे आला. फिर्यादी महिलेच्या बहिणीने चपलेने मारल्याचा बदला घेण्यासाठी राग मनात धरून फिर्यादी यांच्या दरवाजा तसेच खिडक्यांवर दगडफेक करीत काचा फोडलया.
दरम्यान, आरोपी साथीदारांसह महिलेच्या घरात घुसला. त्यांनी त्यांची पर्स नेली. तसेच घराबाहेर जाताना बाहेर ठेवलेली वॉशिंग मशीन आणि दुचाकीची तोडफोड केली. हातातील कोयता हवेत फिरवून ‘मी इथला भाई आहे, तुम्ही कोणी मध्ये आलात तर कोणालाच सोडणार नाही’, असे म्हणत दहशत निर्माण केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.