पुणे : इंदापूरमधील राऊत इलेक्ट्रॉनिक्सचे संजय राऊत आणि रघुनाथ राऊत यांनी धनादेश न वटल्यामुळे या दोन व्यावसायिकांना न्यायालयाने एक महिन्याचा साधा कारावास आणि चार लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अभिषेक एम. बागे यांनी हा निकाल दिला आहे. जेनेक्स कुलिंग सिस्टिम ही आनंद पद्माकर डांगरे यांची एसीच्या सेल्स अँड सर्व्हिसची भागीदारी संस्था आहे.
राऊत इलेक्ट्रॉनिक्स ही इंदापूरची फर्म आहे. ही फर्म जेनेक्स सिस्टिमकडून विविध कंपन्यांचे एसी खरेदी करते. राऊत इलेक्ट्रॉनिक्सने १० ऑक्टोबर २०१६ मध्ये ३ लक्ष १४ हजार रुपये किमतीचे एसी खरेदी केले होते. त्यासाठी एक लाख रुपये दिले होते. उर्वरित २ लाख १४ हजार रुपयांपोटी राऊत इलेक्ट्रॉनिक्सचे प्रोप्रायटर संजय राऊत व रघुनाथ राऊत या दोन्ही बंधूंनी एक धनादेश दिला होता. धनादेश बँकेत वटण्याकरिता भरला असता तो धनादेश न वटता परत आला. त्यानंतर आनंद डोंगरे यांनी अॅड. बिलाल शेख यांच्यामार्फत न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला.
एसीचे १३ नग राऊत इलेक्ट्रॉनिक्सला मिळाले. त्याची पोहोच त्यांनी दिली. कायदेशीर रक्कम व्यवहाराकरिता धनादेश राऊत बंधूंनी स्वतः सही करून दिले. पण, धनादेश न वटता परत आले. त्यामुळे त्यांनी गुन्हा दाखल केल्याचा युक्तिवाद अॅड. शेख यांनी केला. न्यायालयाने तो ग्राह्य धरत व्यावसायिक बंधूंना शिक्षा सुनावली. या प्रकरणात अॅड. शेख यांना अॅड. वसीम पठाण, अॅड. आझम काझी व अॅड. केदार खोपडे यांनी सहकार्य केले.