पुणे : पुण्यातील मुंढवा भागात वाहतुकीदरम्यान एका कुटुंबावर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. हा प्रकार केवळ ट्रॅफिकमध्ये हॉर्न वाजवल्यामुळे घडला असून, हल्लेखोरांनी फायटरने हल्ला करत कुटुंबाला मारहाण केली आहे. या घटनेने पुण्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना काल रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास मुंढवा कोरेगाव पार्क रोडवर घडली आहे. फिर्यादी राजेश नाथोबा वाघचौरे हे त्यांच्या पत्नी आणि मुलीसोबत कोरेगाव पार्कच्या दिशेने जात असताना त्यावेळी वाहतुकीची कोंडी झाल्याने त्यांनी समोरील वाहनाला हॉर्न दिला. मात्र, या साध्या गोष्टीचा राग येऊन समोरील गाडीतील व्यक्तींनी त्यांच्यावर थेट हल्ला केला.
राजू गायकवाड आणि त्यांचा मुलगा शुभम गायकवाड हे समोरील वाहनात होते. हॉर्न वाजवल्याचा राग मनात धरून ते गाडीमधून बाहेर आले आणि वाघचौरे कुटुंबाशी वाद घालू लागले. त्यांनी शिवीगाळ करत वाद उकरून काढला आणि त्यानंतर जवळील फायटरने वाघचौरे यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात वाघचौरे यांच्या पत्नी सुवर्णा आणि मुलगी संस्कृती देखील जखमी झाल्या आहेत.
कुटुंबाला फायटरने मारहाण..
हल्लेखोरांनी वाघचौरे परिवारावर हल्ला करण्यात आला तेव्हा त्यांनी राजेश वाघचौरे यांना फायटरने मारहाण केली आणि त्यांच्या पत्नी व मुलीला देखील जखमी केले. हल्लेखोर हे केवळ मारहाण करून थांबले नाही, तर त्यांनी वाघचौरे यांच्या गाडीचीही तोडफोड केली. हा प्रकार पाहून परिसरातील नागरिकांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, मात्र हल्लेखोरांनी कोणालाही न जुमानल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
पोलिसांकडून तात्कळ कारवाई
या घटनेची माहिती मिळताच मुंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी राजू गायकवाड आणि शुभम गायकवाड यांना तात्काळ अटक केली आहे. पोलिसांकडून दोघांविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांचे पूर्वीही गुन्हेगारी वर्तनाचे प्रकरणे आहेत.
घटनास्थळी पोलीस बंदोबस्त
घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंढवा कोरेगाव पार्क रोडवर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या वादाला बळी न पडण्याचे आणि पोलीस प्रशासनाशी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.