पुणे : विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या शिक्षणाबाबत अनेक धक्कादायक एकार समोर आले आहेत. त्यात पुणे महानगरपालिकेकडून तर कायमच अनेकदा चुकीच्या कामासाठी पैसा खर्च केला जात असल्याचे उघड झाले आहे. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे महानगरपालिका पाढे पाठ करण्यासाठी चक्क सव्वा कोटी रुपये मोजणार आहे. याबाबतचा प्रस्ताव टेंडर न काढता मंजुरीसाठी आणला आहे.
मॅप एपिक कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेडनिर्मित अंकनाद गणिताची सात्मीकरण प्रणाली विद्यार्थ्यांकरिता उपलब्ध करण्याचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांनंतर होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय होणार आहे. अशा प्रकारे पुणे महानगरपालिकेचे सभागृह अस्तित्वात असताना एक विचित्र प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. समाजमाध्यमातून याबाबत आवाज उठविल्यानंतर पालिकेकडून यू टर्न घेण्यात आला होता.
विद्यार्थ्यांमधील गणिताची भीती नष्ट करून गुणवत्ता सुधार करण्याच्या उद्देशाने अंकनाद गणिताची सात्मीकरण प्रणाली या नावाने प्रणाली विकसित केली आहे. कोविड काळापासून मुलांमध्ये गणिताबाबत भीती वाढत आहे. ती कमी करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने या नवीन प्रणालीचा स्वीकार करण्याचा निर्णय घेतला आहे.