मुंबई : मुंबईमध्ये विद्यार्थिनीने शाळेमध्येच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अकरावीमध्ये शिकणाऱ्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गोरेगाव पूर्वच्या नामांकित शाळेमध्ये ही घटना घडली असून या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या विद्यार्थिनीने आत्महत्या का केली यामागचे कारण अद्याप समोर आले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या गोरेगाव पूर्वेकडील आरे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका शाळेमध्ये विद्यार्थिनीने आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास विद्यार्थिनीने शाळेच्या टॉयलेटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. बुटाच्या लेसच्या सहाय्याने गळ्याला दोर लावून मुलीने आत्महत्या केली आहे.
शाळेच्या टॉयलेटमध्ये इतर विद्यार्थी गेले असता हा प्रकार समोर आला. या घटनेमुळे शाळेमध्ये एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच आरे पोलिसांनी शाळेमध्ये धाव घेत विद्यार्थिनीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. विद्यार्थिनीच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. तिच्या पालकांनी देखील काहीच तक्रार केली नाही. आरे पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करत तपास सुरू करण्यात आला आहे.