नांदेड : नांदेडमध्ये मुलाच्या आत्महत्येनंतर वडिलांनी देखील आपलं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मोबाईलसाठी वारंवार हट्ट करून देखील वडिलांनी मोबाईल दिला नाही. त्यामुळे १७ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केली आहे. मुलाच्या आत्महत्येचे वृत्त कळातच चिंतेत आलेल्या वडिलांनी देखील आत्महत्या करून आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. या घटनेमुळे नांदेडमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभ्यासासाठी मोबाईल घेण्याचा तगादा लावल्यानंतरही वडिलांकडून मोबईल देण्यात आला नाही. त्यामुळे नांदेडमध्ये एका १७ वर्षांच्या मुलाने शेतामध्ये जाऊन गळफास लावून आत्महत्या केली. मुलाच्या आत्महत्येमुळे वडिलांना हादराच बसला. मुलाने गळफास घेतल्याचे पाहून पित्यानेही त्याच ठिकाणी गळफास घेतल्याची हृदयद्रावक घटना नांदेडच्या बिलोली तालुक्यातील मिनकी येथे घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
कुटुंबावर दुःखाचा डोंगर..
पिता पुत्राच्या या आत्महत्येनंतर पैलवार कुटुंबीय आणि मिनकी गावावर शोककळा पसरली आहे. मिनकी येथील राजू लक्ष्मण पैलवार हे मध्यमवर्गीय गृहस्थ आपल्या पत्नी आणि तीन मुलांसह राहत होते. त्यांचा ओमकार राजू पैलवार हा मुलगा अकरावीमध्ये शिकत होता. त्याने गेल्या काही दिवसांपासून मोबाईल घेऊन देण्यासाठी वडिलांकडे तगादा लावला होता. अभ्यासासाठी मोबाईल हवा असे तो सांगत होता वडिलांना सांगत होता. .
मात्र घरातील परिस्थितीमुळे राजू पैलवार यांना मोबाईल घेऊन देणे शक्य झाले नाही. बुधवारी रात्री राजू पैलवार आणि त्यांची पत्नी यांच्यात काही कारणावरून वाद झाला. यावेळी मुलगा ओमकार पैलवार यानेही मोबाईल देण्याची मागणी केली. मात्र वडिलांनी मोबाईल घेण्यास नकार दिला. याच रागातून ओमकार शेतामध्ये गेला आणि त्याने गळफास घेतला. त्यानंतर वडील राजू पैलवार यांनी सुद्धा त्याच ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी बिलोली पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.