दीपक खिलारे
इंदापूर : इंदापूर शहरातून जाणाऱ्या पुणे-सोलापूर रस्त्यावरून अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शहरातून जाणाऱ्या या रस्त्यावरून विद्यार्थी व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अवजड वाहनांच्या वाहतुकीस बंदी करून, या वाहनांची वाहतूक बायपास मार्गे करण्यात यावी, अशी मागणी पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या व इस्मा नवी दिल्लीच्या कायदेशीर समितीच्या सहअध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांनी केली आहे. यासंबंधीचे निवेदन अंकिता पाटील ठाकरे यांनी इंदापूर पोलिसांना रविवारी (दि.११) दिले.
इंदापूर शहरातून जाणाऱ्या पुणे-सोलापूर रस्त्यावरून अहोरात्र अवजड वाहनांची वाहतूक सध्या सुरु असल्याने विद्यार्थी व नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
शुक्रवारी या मार्गावर अपघात होऊन एका मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. शहरातून जाणाऱ्या या मार्गावरती महाविद्यालय, शाळा, बस स्थानक, पंचायत समिती कार्यालय, न्यायालय, नगरपालिका भवन इत्यादी महत्त्वाची ठिकाणे असल्याने हजारो विद्यार्थी व नागरिकांची कायम वर्दळ सुरु असते.
शहरातून जाणाऱ्या या मार्गावरती नियम धाब्यावर बसवून पार्किंग व वाहतूक होत असल्याने वारंवार अपघात घडत आहेत. त्यामुळे शहरातून अवजड वाहनांना बंदी करून, महाविद्यालये-शाळा भरताना व सुटतानाच्या वेळेमध्ये वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी व वाहतुकीस शिस्त लावावी, असे अंकिता पाटील ठाकरे यांनी निवेदनामध्ये नमूद केले आहे. दरम्यान, या सर्व मागण्या रास्त असून, या मागण्यांची अंमलबजावणी केली जाईल, असे यावेळी इंदापूर पोलिसांनी नमूद केले.