पुणे: शहरात पुन्हा एकदा कोयता गँग चर्चेत आलेली पाहायला मिळत आहे. गेल्या चार दिवसात पुणे शहरात कोयता हल्ल्याच्या एकूण तीन घटना समोर आल्या आहेत. पुण्यातील बिबेवाडी ,येरवडा , डेक्कन आणि हडपसर परिसरात कोयता गँगचा अक्षरशः धुमाकूळ पाहायला मिळत आहे. शहरामध्ये कोयत्याने सध्या तरुण-तुरुणीवर हल्ले होताना दिसतायत तर काही ठिकाणी दहशत माजवण्यासाठी कोयत्याने गाड्यांची तोडफोड केल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
पुण्यात मागील काही दिवसात गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. येरवडा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या एका महिलेवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली आहे. मात्र अधिकच्या रक्तस्त्रावामुळे तरुणीचा मृत्यू झाला आहे. आरोपी हा तिच्याच कंपनीतील सहकारी असून एका शुल्लक वादातून हा प्रकार घडल्याने सांगण्यात आले आहे. त्या तरुणीच्या सोबत काम करणाऱ्याच कृष्णा सत्यनारायण कनोजा या आरोपीने शुल्लक कारणावरून तरुणीवर वार केले आहेत. आणि या हल्ल्यात शुभदा शंकर कोदरे या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
बिबेवाडी परिसरात दोघांवर कोयत्याने वार
तर कोयत्याच्या दुसऱ्या हल्ल्यात बिबेवाडी परिसरात एका तरुणाने आपल्या हाताचा पंजा गमावला आहे. सोमवारी संध्याकाळी बिबेवाडी परिसरात फिर्यादी आणि त्याचा मित्र पीयूष यांना आरोपींनी भेटायला बोलावले होते. पूर्वी त्यांच्यात वाद झाल्याने या वादाचा बदला घेण्यासाठी आरोपींनी त्यांच्यावर कोयत्याने वार केले. यामध्ये पीयूषच्या हातावर आरोपींनी कोयता मारला ज्यामध्ये त्याच्या हाताचा पंजा तुटून जमिनीवर पडला आणि पीयूष गंभीर जखमी झाला आहे. इतकंच नाही तर पीयूषच्या हातावर आणि मांडीवर सुद्धा आरोपींनी कोयत्याने सपासप वार केले. घटनेनंतर दोन्ही जखमींना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी देखील पुणे पोलिसांकडून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे
कोयत्याने गाड्यांची तोडफोड, दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न
पुणे शहरात अनेक ठिकाणी केवळ दहशत माजवण्यासाठी कोयत्याने आणि तलवारीने गाड्यांची तोडफोड केली जात आहे.पुण्यातील वारजे परिसर तसेच लोहगाव परिसरात तरुणांकडून केवळ आपली दहशत राहावी म्हणून अनेक गाड्यांची तोडफोड केल्याच्या घटना गेल्या पंधरवाड्यात अनेक वेळा घडून आल्या आहेत.
17 वर्षीय तरुणीला कोयत्याचा धाक दाखवून लुटले
तर डेक्कन पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका 17 वर्षीय तरुणीला कोयत्याचा धाक दाखवून लुटण्यात आल्याची घटना समोर आली आहे. हनुमान टेकडीवर गेल्या चार महिन्यापासून हे दोन आरोपी फिरायला येणाऱ्या लोकांना लुटत होते या प्रकरणातील तीन आरोपींना आज पुणे पोलिसांनी अटक देखील केली आहे. आणि त्यांच्याकडून मुद्देमाल तसेच कोयता देखील जप्त करण्यात आला आहे.
शहरातील या भागात घटना घडल्याचे समोर आले
पुण्यातील येरवडा परिसरात असणाऱ्या एका आयटी कंपनीच्या पार्किंग मध्ये एका 30 वर्षीय आरोपीने त्याच्या सोबतच काम करणाऱ्या 28 वर्षीय तरुणीवर कोयत्याने वार केला आणि या घटनेत या तरुणीचा मृत्यू झाला.पुण्यातील बिबेवाडी परिसरात दोन तरुणांवर कोयत्याने काल रात्री हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्या तरुणाला आपल्या हाताचा पंजा गमवावा लागला आहे .हनुमान टेकडीवर फिरण्यासाठी गेलेल्या एका 17 वर्षीय तरुणीस कोयत्याचा धाक दाखवून लूटमार करण्यात आली.तर काही दिवसांपूर्वी लोहगाव परिसरात केवळ दहशत माजवण्यासाठी तरुणांकडून कोयते आणि तलवारी हातात घेत गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याचे समोर आले आहे.
पुण्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे का?
पुणे शहरात गेल्या काही दिवसात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कुठ कोयत्याने हल्ला, कुठ हत्या, तर कुठ फायरींग तर कुठे गाड्यांची तोडफोड सुरूच आहे. तर उलट या सगळ्यांवर बोलताना पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी जाहीर कार्यक्रमातून गुन्हेगारांना कठोर इशारादिला आहे. दोन दिवसापूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बेकायदेशीर धंदे, गँग चालवून खंडणी मागणारे, बळाच्या जोरावर जमीन खाली करायला लावणाऱ्या टोळक्यांना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ‘वॉर्निंग’ दिली आहे. कुठलेही अवैध धंदे करत असाल तर शहर सोडून निघून जा, नाहीतर तुमच्या 7 पिढ्यांची आठवण करून देऊ, पोलीस आयुक्तांनी हा थेट इशाराच शहरातील गुन्हेगारांना दिला आहे.