कल्याण : कल्याणमध्ये भीषण अपघाताची घटना घडल्याचे समोर आले आहे. भरधाव ट्रकने आई आणि मुलाला चिरडलं आहे. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. कल्याण पश्चिमेच्या लाल चौकी परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. हा ट्रेक केडीएमसीचा असून ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिम येथील लालचौकी परिसरात आज दुर्दैवी घटना घडली. केडीएमसीच्या ट्रकच्या धडकेत एका महिलेचा आणि तिच्या मुलाचा जागीच करुण अंत झाला आहे. महिला आपल्या मुलासह रस्ता ओलांडत असताना हा अपघात झाला आहे. निशा सोमेसकर आणि अंश सोमेसकर असं मृत आई आणि मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे लालचौकी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या अपघातानंतर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच कल्याण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. पोलिसांकडून ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
अपघातानंतर मनसे आक्रमक..
अपघाताच्या घटनेनंतर मनसे आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. या रस्त्यावरील डिव्हायडर तुटल्याने अपघात झाल्याचा आरोप मनसेने केला आहे. माजी आमदार प्रकाश भोईर आणि कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडत रस्ता रोको आंदोलन केले आहे. अपघात होऊन तासाभराचा कालावधी लोटला. मात्र केडीएमसी अधिकारी घटना स्थळी न आल्याने माजी आमदार भोईर झाले होते.