सातारा : पत्नीचे नाव सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी ५०० रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी फलटण कसबा पेठ (ता. फलटण) येथील कोतवाल दीपक दौलतराव उदंडे ( वय ४९) याला सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली. या कारवाईमुळे महसूल विभागामध्ये खळबळ उडाली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सरकारी कामकाजामध्ये सुलभता आणण्यासाठी सातत्याने सक्रिय आहे. अँटी करप्शन आपल्या दारी हा उपक्रम गेल्या एक महिन्यापासून सातत्याने राबवला जात आहे. तरीसुद्धा नागरिकांकडे शासकीय कामांसाठी पैशाची मागणी वारंवार होत आहे.
फलटण येथे उदंडे या कोतवालाकडून पैशाची मागणी झाल्याची तक्रार फिर्यादीने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग साताराचे पोलीस उपाधीक्षक राजेश वाघमारे यांच्याकडे नोंदवली होती. तक्रारदार यांच्या पत्नीचे नावे दीड गुंठे जागेसह खरेदी केलेल्या सातबाऱ्यावर नोंद करून घ्यावयाची होती. त्याकामासाठी एक हजार रुपयांची मागणी करण्यात आली. अखेर तडजोडीअंती पाचशे रुपये देण्याचे ठरले. कार्यालयाच्या परिसरातच पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले, पोलीस हवालदार गोगावले व गणेश ताटे यांच्या पथकाने सापळा रचून त्यांना अटक केली. पुणे परिक्षेत्राचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरिष देशपांडे व अपर पोलीस अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.