ओतूर : कार आणि दुचाकीची धडक बसून झालेल्या अपघातात एकजण ठार झाला तर एक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना कल्याण अहिल्यानगर महामार्गावर हॉटेल निमंत्रण समोर घडली. प्रेम घोडेकर असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कल्याण अहिल्यानगर महामार्गावर ओतूर कडून कल्याणच्या दिशेने जाणारी दुचाकी व कल्याण दिशेकडून ओतूरच्या दिशेने येणारी कार यांची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने दुचाकीवरील प्रेम घोडेकर हा तरूण जागीच ठार झाला.
कारमधील एक व्यक्ती गंभीर जखमी झाला. सदर अपघातात कार व दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार सुरेश गेंगजे, संदीप भोते, शामसुंदर जायभाये यांनी घटनास्थळी हजर होऊन सदर महामार्गावरील अपघातग्रस्त वाहने रस्त्यातून दूर करून वाहतूक सुरळीत केली. पुढील तपास ओतूर पोलीस करत आहे.