मुंबई : प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी मध्य रेल्वे सातत्याने प्रयत्न करीत असून, गाड्यांचा वेग वाढविण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणून गाड्यांची गती वाढवण्यासाठी दौंड-सोलापूर-वाडी विभागात ट्रॅक सुधारणा, ओव्हरहेड इक्विपमेंट रेग्युलेशन, सिग्नलिंग कामे वेगाने करण्यात येत आहेत. या कामांमुळे दौंड-सोलापूर-वाडी विभागात पूर्वी ११० किमी वेगाने धावणाऱ्या अप-डाऊन मार्गावरील गाड्या आता १३० किमी प्रतितासपर्यंत वेगाने धावणार असून, यामध्ये ८८ लांब पल्ल्यांच्या गाड्यांचा समावेश आहे.
या निर्णयामुळे प्रवाशांना आपला प्रवास कमी वेळेत पूर्ण करता येणार असून, प्रवाशांना वेगवान प्रवासामुळे दिलासादेखील मिळणार आहे. हे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर भविष्यात या मार्गावर गाड्यांची संख्यादेखील वाढवण्यास मध्य रेल्वे प्रशासनाला वाव आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने विचार केल्यास, वेगवान गाड्यांमुळे इंधनाचा वापर कमी होतो, परिणामी हरितगृह वायूचे उत्सर्जन कमी होते आणि कार्बन फूटप्रिंट कमी होतो. दरम्यान, वेग वाढ, गाड्यांचा वक्तशीरपणा याकडे लक्ष देण्यात येत असून, भविष्यात प्रवाशांचा मध्य रेल्वेवरील प्रवास ‘जलद, सुखकर आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्वत्तोपरी प्रयत्न करणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी दिली.