लोणी काळभोर, (पुणे) : रुग्णालयात औषधोपचारांसाठी दाखल असताना रुग्णालयांशी संलग्न औषध दुकानांमधून औषध खरेदीची सक्ती याबाबत “पुणे प्राईम न्यूज” ने आवाज उठवला होता. त्यानुसार रुग्णालयांशी संलग्न औषध दुकानांतून औषध खरेदी करणे बंधनकारक नसल्याचा निर्वाळा अन्न आणि औषध प्रशासनाने दिला आहे. याबाबत एफडीएचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी याबाबतचे पत्र नुकतेच प्रसिद्ध केले आहे.
रविवार (ता. २७ नोव्हेंबर) “पुणे प्राईम न्यूज” च्या अंकात पूर्व हवेलीमधील रुग्णालयांकडून रुग्णांना हजारो रुपयांचा “चुना”, “कायद्यात नसतानाही औषधांची खरेदी ठराविक मेडिकलमधूनच सक्ती” या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते.
औषधे आणि सौंदर्यप्रसाधने कायदा १९४० अंतर्गत नियमांचा दाखला देऊन अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) कडून या बाबतचे आदेश प्रसृत करण्यात आले आहेत. एफडीएचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी याबाबतचे पत्र नुकतेच प्रसिद्ध केले आहे. हे पत्र राज्यातील सर्व विभागीय सह-आयुक्त, सहायक आयुक्त आणि औषध निरीक्षक (औषधे) यांना या पत्राच्या प्रती पाठवण्यात आल्या आहेत.
रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या, रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना हा निर्णय दिलासादायक ठरणार आहे. पत्र प्रसिद्ध करण्याबरोबरच त्याबाबतची स्पष्ट सूचना देणारा फलक रुग्णालयांच्या दर्शनी भागात लावण्यात यावा, असेही या पत्राद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. रुग्णांनी रुग्णालयाशी संलग्न औषध दुकानांतूनच औषधांची खरेदी करणे बंधनकारक नसून कोणत्याही नोंदणीकृत औषध विक्रेत्याकडून रुग्ण किंवा त्यांचे कुटुंबीय औषध खरेदी करू शकतात, असा स्पष्ट उल्लेख असलेले फलक रुग्णालयांनी दर्शनी भागात लावावेत, असेही एफडीएने आपल्या आदेशात नमूद केले आहे.
हडपसर पासुन ते थेट उरुळी कांचनपर्यत असणाऱ्या बहुतांश रुग्णालयांनी मेडीकलवाल्यांच्याकडुन सहकार्याच्या बोलीवर लाखो रुपये घेऊन आपआपल्या हद्दीत मेडीकलची दुकाने चालु करण्यास परवानगी दिलेली आहे. तर दुसरीकडे रुग्ण खरेदी करत असलेल्या बिलाच्या रकमेवर रुग्णालयांना ठरावीक टक्के कमीशन द्यावे लागत असल्याची कबुली रुग्णालयाच्या हद्दीत चालत असलेल्या मेडीकल वाल्यांनी “पुणे प्राईम न्यूज” शी बोलतांना दिली होती. यामुळे रुग्णालयात प्रवेश केल्यापासुन ते उपचार होऊन रुग्ण रुग्णालयाच्या बाहेर पडेपर्यंत लागणारी सर्व प्रकारची औषधे रुग्णालय सांगेल त्या मेडीकलमधुनच खरेदी करावी लागत आहेत.
रुग्णालयापासुन हाकेच्या अंतरावर असणाऱ्या मेडीकलमध्ये औषधांच्यावर दहा ते वीस टक्के सुट मिळत असतानांही, पुर्व हवेलीमधील बहुतांश बड्या रुग्णालयांच्या “हम करे सो कायदा” या वृत्तीमुळे गोरगरीब नागरीकांना हजारो रुपयांचा भुर्दंड सोसावा लागत होता.
तसेच पूर्व हवेलीत पॅथॉलिजी लॅबोरेटरीज यांच्या साटेलोट्यामुळे गोरगरीब रुग्णांची आर्थिक पिळवणूक होत आहे. पूर्व हवेलीत रक्त, लघवी, एक्स-रे, सी.टी. स्कॅन, एम. आर. आय., यासारख्या तपासण्या करणाऱ्या लॅबची संख्या सध्या वाढत आहे. या सर्वच लॅबचे दर वेगवेगळे असून, कोठेही याचे दरपत्रक प्रशास नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे फक्त एम.डी. पॅथॉलॉजिस्टनाच अशा लॅब चालविण्याचा अधिकार असताना, ठिकठिकाणी या लॅबचे पेव फुटले आहेत. विशेष बाब म्हणजे पॅथॉलॉजी लॅबोरेटरीजमधील रिपोर्टच्या खरेखोटेपणाबाबत उलट सुलट चर्चा होत असल्याने, एकुणच वरील प्रकरण शासनाने गंभीररित्या घेण्याची गरज निर्माण झाली होती.
दरम्यान, पूर्व हवेलीतील कदमवाकवस्ती (स्टेशन) एका बड्या हॉस्पिटलसह पूर्व हवेलीतील हॉस्पिटलनी औषध दुकानांमधून औषध खरेदीची सक्ती केल्यास [email protected] या मेलवर तक्रारी करा. यावरील आलेल्या तक्रारी अन्न व प्रशासन विभागाच्या निदर्शानास आणून त्याची दखल घेण्यास सदर विभागाला भाग पाडू.