पिंपरी : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत पेट्रोल पंपावरील स्वच्छतागृह ग्राहकांसह सर्व नागरिकांना उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. त्यामुळे पेट्रोल पंपावरील स्वच्छतागृह नागरिकांसाठी बंद आढळल्यास संबंधिताविरुध्द कारवाई केली जाणार आहे. तसे पत्र महापालिका आरोग्य विभागाकडून पेट्रोल पंपचालकांना दिले जाणार आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील विविध मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर सार्वजनिक स्वच्छतागृहाची संख्या कमी आहे. कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या नागरिक आणि महिलांची स्वच्छतागृहा अभावी मोठी अडचण होत असते. शहरातील प्रत्येक पेट्रोल पंपावर नागरिकांसाठी स्वच्छतागृहाची व्यवस्था केली जाते. तसेच हे स्वच्छतागृह सर्व नागरिकांना उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. मात्र, अनेक पेट्रोल पंपावरील स्वच्छतागृहे बंद अथवा नादुरूस्त, अस्वच्छ असतात. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभाग शहरातील सर्व पेट्रोप पंपचालकांना नागरिकांसाठी स्वच्छतागृहे सुरू ठेवण्याबाबत आवाहन करणार आहे.
यासाठी पंपचालकांना आरोग्य विभागातर्फे सरुवातीला पत्र दिले जाणार आहे. एक महिन्यानंतर सर्व पेट्रोल पंपावरील स्वच्छतागृहे स्वच्छ आणि सुरू आहेत का, याची पाहणी विभागाच्या पथकामार्फत केली जाणार आहे, असे आरोग्य विभागाचे सहायक आयुक्त अजिंक्य येळे यांनी सांगितले.