राहुलकुमार अवचट
यवत : महापुरुषांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्य बाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा निषेध करत दौंड तालुका जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने यवत पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नारायण पवार यांना निवेदन देण्यात आले.
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल सत्यशोधक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, परमपूज्य विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
त्याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले वाडा येथील समता भूमीवर येऊन महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, यांची जाहीर रित्या माफी मागावी.
महापुरुषांची बदनामी व बेताल वक्तव्य तसेच महापुरुष हे आमचे दैवत असल्याने भावना दुखावल्या प्रकरणी त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. अन्यथा संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेड राज्यभर चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा निवेदनद्वारे देण्यात आला आहे.
यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष सारिका भुजबळ, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा संघटक भरत भुजबळ, समता परिषदेचे मंगेश रायकर, पायल पवार, वनिता लोहार, काळुबाई लोहार, उषा गायकवाड, वंदना कुदळे, रोहिणी राऊत, दिपाली गायकवाड, रवि गायकवाड, पोपट लकडे, तेजस गायकवाड यांसह जिजाऊ ब्रिगेडचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.