पुणे : चीनमध्ये फैलावलेल्या ‘एचएमव्हीपी’ या विषाणूमुळे होणाऱ्या संसर्गज्य आजाराच्या पार्श्वभुमीवर पुणे महापालिकेचा आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आला आहे. राज्य सरकारकडून मिळालेल्या सुचनेनुसार कार्यवाही सुरु केली असुन, नायडू रुग्णालयात साडे तीनशे बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांचे स्क्रीनिंग करण्याविषयी तयारी सुरु केली आहे.
एचएमव्हीपी या विषाणूचा चीन मध्ये फैलाव झाला आहे. तसेच मलेशिया मध्ये या विषाणूची बाधा झालेले रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभुमीवर केंद्र सरकार आणि राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांना निर्देश दिले आहे. त्यानुसार पुणे महापालिकेने कार्यवाही करण्यास सुरुवात केली आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या आरोग्य विभागांसाठी नियमावली तयार केली आहे.
याबाबत ३ आणि ६ जानेवारीला राज्य शासनाची बैठक पार पडली. त्यावेळी ही नियमावली जाहीर केली असून महापालिकेच्या प्रत्येक रुग्णालयांना पाळण्याचे आदेश दिले आहेत. पुण्यात या व्हायरस संदर्भात खबरदारीसाठी उपाययोजना करण्यात येत आहे. त्यात नागरिकांनी कशी काळजी घ्यावी या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. राज्यात अजून एकाही रुग्ण नाही पण महापालिका खबरदारीचा उपाय म्हणून बेड राखीव ठेवण्यासाठी पत्र देण्यात आले आहेत.
हे करू नका
- हस्तांदोलन
- टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर
- आजारी लोकांशी जवळचा संपर्क
- डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श
- सार्वजनिक ठिकाणी भुंकणे
हे करा
- खोकताना, शिंकताना तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका.
- साबण, पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने हात वारंवार धुवा.
- ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.
- भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक आहार घ्या.
- संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायुविजन ठेवा.