पुणे : खनिज विषयक शासनाच्या जाचक अटी व याविषयी सतत बदलत्या धोरणामुळे व्यवसायासाठी अडचणी निर्माण होत असल्याने पुणे जिल्हा खाण व क्रशर उद्योजक संघाने शुक्रवार (ता. ९) पासून बेमुदत बंद पुकारला आहे.
शुक्रवारी (ता. ९) संघाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती संघाचे कार्याध्यक्ष रामदास दाभाडे यांनी दिली आहे. या बैठकीसाठी जिल्ह्यातील सर्व उद्योजक उपस्तीत होते.
दाभाडे पुढे म्हणाले की, पुणे शहरात दिवसा प्रवेश करण्यासाठी जड वाहनांना बंदी आहे. यामुळे दिवसा मालाचा पुरवठा करता येत नाही. रात्री ११ नंतर पुरवठा करणे शक्य नाही. नगर महामार्गावर सकाळी आठ ते दुपारी १२ पर्यंत जड वाहतुकीला बंदी आहे.
मात्र या बंदीनुसार कार्यवाही होत नाही. केवळ गौन खनिज वाहतूक करणाऱ्या डंपर अडविले जाते. अन्य जड वाहतूक सुरू असते. त्यामध्ये प्रामुख्याने सिमेंट रेडी मिक्स वाहतूक करणारे मिक्सर, मोठे कंटेनर यांना अडविले जात नाही. अशी दुटप्पी कारवाई होत असल्याने केवळ खाण क्रशर उद्योगाचे नुकसान होते. गौन खनिजाला ६०० रुपये रॉयल्टी आहे.
याशिवाय १८ टक्के जी एस टी वेगळा, १० टक्के खनिज कर्म प्रतिष्ठाण, दोन टक्के टीडीएस व रॉयल्टी चलन १४ रुपये प्रति ब्रास. एवढा भरमसाठ कर द्यावा लागतो. त्यामुळे दर खूप वाढतो. असे वेगळे कर लावण्यापेक्षा रॉयल्टी मध्ये च त्याचा समावेश करावा. शासनाच्या अशा जाचक अटीमुळे व्यवसाय करणे अडचणीचे ठरत असल्याने या अटी रद्द कराव्या या मागणीसाठी बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत बांधकाम संघटनेला कळविण्यात आले असून जिल्हाधिकारी यांना सोमवारी पत्र देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.