पुणे : सलामीवीर इशान किशनने बांगलादेशविरुद्ध इतिहास रचला आहे. शेवटच्या वनडेत इशान किशनने १३१ चेंडूत २१० धावांची धडाकेबाज खेळी केली आहे.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावून वेस्ट इंडिजचा फलंदाज ख्रिस गेलचा विश्वविक्रम मोडला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये १३१ चेंडूत द्विशतक झळकावण्याचा विश्वविक्रम वेस्ट इंडिजचा फलंदाज ख्रिस गेलच्या नावावर होता, मात्र आता इशान किशनने त्याचा विश्वविक्रम मोडून इतिहास रचला आहे.
इशान किशनने ५० चेंडूत अर्धशतक, ८५ चेंडूत शतक, १०३ चेंडूत १५० धावा केल्यानंतर या सलामीवीराने १२६ चेंडूत द्विशतक पूर्ण केले. इशान १३१ चेंडूत २१० धावा करून बाद झाला. यादरम्यान त्याने २३ चौकार आणि ९ षटकार मारले. यापूर्वी माजी दिग्गज सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा आणि वीरेंद्र सेहवाग यांनी भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतके झळकावली आहेत.
ईशान किशनची एकदिवसीय सामन्यातील ही ९वी खेळी आहे. त्याने आतापर्यंत ३ अर्धशतके आणि एक शतक झळकावले आहे. म्हणजेच तो प्रत्येक दुसऱ्या डावात ५० हून अधिक धावांची इनिंग खेळताना दिसला. या सामन्यापूर्वी ईशानने एकदिवसीय सामन्यांच्या ८ डावात ३३ च्या सरासरीने २६७ धावा केल्या होत्या. ९३ धावा ही त्याची आतापर्यंत सर्वोत्तम खेळी होती. त्याने २१ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ५८९ धावा केल्या आहेत आणि ४ अर्धशतके झळकावली.
दरम्यान, भारत विरुद्ध बांगलादेशमध्ये तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना चितगाव येथे खेळवला जात आहे. बांगलादेशने सुरुवातीचे २ सामने जिंकले असून त्यांनी मालिका जिंकली आहे. तर भारतीय संघ अद्याप विजयच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे टीम इंडिया आजच्या सामन्यात विजय मिळवण्याच्या हेतूने उतरली आहे आणि या विजयाची भूक भारताच्या फलंदाजांनी दाखवून दिली आहे. ईशान किशनसमोर आज बांगलादेशचा प्रत्येक गोलंदाज नमला आहे.