पुणे : प्रकाशतात्या बालवाडकर संघाने सुवर्णयुग स्पोर्ट्स क्लब संघाला पराभूत करताना कै. प्रकाश (बापू) सणस यांच्या स्मरणार्थ, सरस्वती क्रीडा संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या खुल्या गटाच्या जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत विजयी आगेकूच कायम राखली.
नातूबाग येथील मैदानावर सुरु असलेल्या स्पर्धेच्या मुलींच्या गटात प्रकाशतात्या बालवाडकर संघाने सुवर्णयुग स्पोर्ट्स संघाला ३६-२० असे १६ गुणांनी पराभूत केले. मध्यंतराला प्रकाशातात्या बालवाडकर संघाने १९-१३ अशी ६ गुणांची मह्तवपूर्ण आघाड़ी घेतली होती.
प्रकाशतात्या बालवाडकर संघाकडून आम्रपाली गलांडे, अंकिता चव्हाण व गौरी कदम यांनी आक्रमक चढाया करताना गुणांची कमाई केली. गौरी जाधव व सानिका धायरकर यांनी पकडी करताना संघाला महत्वपूर्ण गुण मिळवून दिले. पराभूत सुवर्णयुग संघाकडून ऐश्वर्या काळे, प्रतीक्षा निवंगुणे व दीप्ती दिघे यांनी चांगली लढत दिली, मात्र त्या संघाला पराभवापासून वाचवू शकल्या नाहीत.
तत्पूर्वी काल रात्री उशीरा झालेल्या मुलांच्या विभागातील साखळी गटाच्या लढतीमध्ये राकेशभाऊ घुले संघाने पर्व क्रीडा संस्था संघाला २६-१६ असे १० गुणांच्या फरकाने पराभूत केले. मध्यंतराला राकेशभाऊ घुले संघाने ८-६ अशी २ गुणांची आघाडी घेतली होती. विजयी राकेशभाऊ घुले संघाने आदित्य कसाळे, गौरव तापकीर व अभिमन्यू गावडे यांनी दमदार खेळाचे प्रदर्शन करताना संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पराभूत संघाकडून अजय चव्हाण व सनी जाधव यांनी दिलेली लढत अपुरी ठरली.
मुलांच्या विभागातील दुसऱ्या अटीतटीच्या साखळी लढतीमध्ये नवमहाराष्ट्र कबड्डी संघाने वेताळेश्वर मांजरेवाडी संघाला १४-१२ असे केवळ २ गुणांनी पराभूत केले. मध्यंतराला वेताळेश्वर संघाने ७-१ अशी आघाडी घेतली होती. मात्र मध्यंतरानंतर दोन्ही संघातील चुरस आणखी वाढली.
विजयी नवमहाराष्ट्र संघाकडून अजय गायकवाड, केतन गायकवाड, महेश वाडकर यांनी तर पराभूत वेताळेश्वर संघाकडून रोहित मांजरे, प्रथमेश मांजरे, शशिकांत होले यांनी दमदार खेळाचे प्रदर्शन केले.
मुलांच्या तिसऱ्या साखळी लढतीमध्ये सिंहगड क्रीडा मंडळ संघाने शिवशक्ती कबड्डी संघाला १४-१ असे पराभूत केले. मध्यंतराला शिवशक्ती कबड्डी संघाने ६-५ अशी एका गुणांची महत्वपूर्ण आघाडी होती. सिंहगड क्रीडा मंडळाकडून शुभम शिंदे व अकबर मणियार यांनी चढाया करताना तर अमित देवकाते याने पकडी करताना संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पराभूत शिवशक्ती संघाकडून कृष्णा दौंड, अमित काळे यांनी दमदार खेळ केला परंतु ते संघाला पराभवापासून वाचवू शकले नाहीत.
मुलींच्या गटाच्या लढतीमध्ये तिरंगा स्पोर्ट्स क्लब पुणे संघाने ब्रम्हा विष्णू महेश स्पोर्ट्स क्लब संघाला ४९-२५ असे २४ गुणांनी पराभूत केले. तिरंगा संघाच्या प्राची कांबळे, साक्षी रेणुसे, रिया धुमाळ यांनी आक्रमक चढाया करताना मध्यंतराला २८-१० अशी १८ गुणांची आघाडी मिळवून दिली.
मध्यंतरानंतर तनिष्का सिंगने पकडी करताना संघाच्या विजयात हातभार लावला. पराभूत ब्रम्हा विष्णू महेश स्पोर्ट्स संघाकडून गीता पवार व अमृता जाधव यांनी चांगली लढत दिली.
मुलींच्या गटातील जागृती क्रीडा प्रतिष्ठाण संघाने शिवाई क्रीडा मंडळ संघाला ५८-१६ असे ४२ गुणांनी पराभूत केले. तन्वी लोहार, साक्षी मासूरकर, अनुष्का यादव व कृतिका तळेकर यांनी चढाया करताना संघाला विजय मिळवून दिला. पराभूत संघाकडून वैष्णवी चव्हाण व तन्वी गायकवाड यांनी लढत देण्याचा प्रयत्न केला. मध्यंतराला जागृती प्रतिष्ठाण संघाने २९-७ अशी आघाडी घेतली होती.