बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. वाल्मिक कराड हा पुण्यात सीआयडीला शरण गेला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात तो मुख्य मास्टरमाइंड असल्याचा त्याच्यावर आरोप होत आहे. खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड आरोपी होता. त्या गुन्ह्यात तो शरण गेल्याची माहिती आहे. वाल्मिक कराडच्या अटकेनंतर संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुखची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे हीच मागणी आहे. पोलीस यंत्रणा काम करतेय मग इतका वेळ का लागतोय?. गुन्हेगार स्वत: सरेंडर होत असेल, मग पोलीस यंत्रणा काय काम करतेय?. आरोपींना पकडायला इतका वेळ का लागतोय? मग, आम्हाला न्याय कसा आणि कधी मिळणार? असे प्रश्न वैभवी देशमुखने विचारले आहेत.
नेमकं काय म्हणाली वैभवी देशमुख?
“माझ्या वडिलांची ज्यांनी क्रूर हत्या केली, त्यांना अटक करा. जे तीन आरोपी फरार आहेत, त्यांना अटक करा. लवकरात लवकर न्याय द्या” अशी मागणी वैभवी देशमुखने केली आहे. वाल्मिक कराडने खंडणी प्रकरणात शरणागती पत्करली आहे, याबाबत पत्रकारांनी वैभवीला विचारलं, त्यावर ती म्हणाली की, “आम्हाला एवढच वाटतय की, ज्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली, त्यांच्यावर कारवाई करा. वडिल पुन्हा आणू शकत नाही. पण त्यांचं बलिदान व्यर्थ जाता कामा नये. आमच्या सगळ्यांच एकच मत आहे, माझ्या वडिलांच्या हत्येमध्ये जे कोणी असतील, त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे” अशी वैभवी देशमुख म्हणाली आहे.
हत्येला 22 दिवस झालेत, मात्र..
“संतोष देशमुख यांच्या हत्येला 22 दिवस झालेत, तीन आरोपी अजून भेटत नाहीत. न्याय कधी मिळणार? लवकरात लवकर न्याय मिळण्यासाठी आरोपींना अटक झाली पाहिजे” असं वैभवी देशमुखने म्हटलं आहे. वाल्मिक कराडने शरणागती पत्करण्यापूर्वी एक व्हिडीओ शेअर केला आहे.
नेमकं काय म्हणाला वाल्मिक कराड?
मी वाल्मीक कराड केज पोलीस स्टेशनमध्ये माझ्या विरोधात खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाली आहे. मला अटकपूर्व अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण येथे सरेंडर होत आहे. संतोष देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. राजकीय रोषापोटी माझं नाव त्यांच्याशी जोडले जात आहे, पोलीस तपासाचे निष्कर्ष येतील. त्यात मी जर दोषी दिसलो तर मला शिक्षा द्यावी ती मी भोगायला तयार आहे असं वाल्मीक कराड यांनी स्वतः शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
मनोज जरांगे पाटील काय म्हणाले?
“कोण शरण आलं आणि कोण नाही याच्याशी आम्हाला काही घेणंदेणं नाही. आमच्या भावाची हत्या झाली. त्यातील आरोपी सुटता कामा नये. सीआयडी आणि पोलीस यांनी चौकशी करायची आहे” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.