लोणी काळभोर : मालवाहू टेम्पोवर दगडफेक करून आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) येथील चालकाला लुटल्याची धक्कादायक घटना पुणे-सोलापूर महामार्गावरील शेवाळेवाडी परिसरात गुरुवारी (ता.८) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. त्यांच्याकडील ८ हजारांची रोकड व १० हजारांचा मोबाइल असा एकूण १८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
याप्रकरणी विजय कोतवाल (वय-४५, रा. म्हातोबाची आळंदी, ता.हवेली)) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार तीन चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजय कोतवाल हे मालवाहू टेम्पोवर चालक आहेत. ते गुरुवारी (ता.८) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास माल घेऊन मार्केटयार्डकडे चालले होते. त्यांची गाडी शेवाळवाडी परिसरात आली असता, टोळक्याने त्यांच्या टेम्पोवर दगडफेक करून विजयला वाहन थांबवण्यास भाग पाडले.
दरम्यान, टेम्पो थांबविल्यानंतर चोरट्यांनी फिर्यादी विजय यांच्या कडील ८ हजारांची रोकड आणि १० हजारांचा मोबाइल असा एकूण १८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी विजय कोतवाल यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार तीन चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास हडपसर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे करीत आहेत.