हिंगोली : औंढा तालुक्यातील वगरवाडी गावात प्रेमप्रकरणातून एका २९ वर्षीय तरूणीची प्रियकर आरोपीनं हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तरूणीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह जंगलात फेकला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
श्रीकांत सुरेश पिनलवार असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे, तर अलका बाजीराव बेंद्रे असं हत्या करण्यात आलेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणानंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील वगरवाडी शिवारात घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी श्रीकांत सुरेश पिनलवार आणि मृत तरूणी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. रिलेशनशिपमध्ये सतत वाद होत असल्याने आरोपीने छत्रपती संभाजीनगर येथील लाडगावमधील भाड्याच्या रूमध्ये तरूणीचा गळा आवळून तिची हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने मृतदेह जंगलात फेकला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या प्रकरणाचा तपास करण्यास सुरूवात केली आणि गुन्ह्याची नोंद केली. तरूणीची हत्या केल्याने तिची ओळख पटवण्यात पोलिसांना अडचण येत होती.
मात्र, पाच दिवसांनंतर मृत तरुणीची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. मृत तरूणी नगर जिल्ह्यातील जामखेडमधील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या तरूणीची हत्या प्रेमप्रकरणातून झाल्याची माहिती पोलीस तपासातून निष्पन्न झाले असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेतले असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.