मुंबई : अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारचा भीषण अपघात झाला. कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून शुक्रवारी मध्यरात्री कांदिवलीत अपघात झाला. या अपघातात मेट्रोच्या एक कामगाराचा मृत्यू झाला असून, उर्मिला यांच्यासह कारचालक आणि अन्य एक कामगार जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणई महत्त्वाची माहिती समोर येत आहे. आता कार चालकाला अटक करण्यात आली आहे.
गजानन पाल असे चालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्मिला कोठारेच्या गाडीचा अपघात शुक्रवारी मध्यरात्री झाला. उर्मिला आपल्या मैत्रिणीला भेटून घरी परतत होती, त्यावेळी हा अपघात झाला. यापूर्वी गाडीत मागे सीटवर बसलेल्या मैत्रिणीला उर्मिलानं जोगेश्वरीला सोडलं. त्यानंतर ठाणे-घोडबंदर मार्गानं ती घरी जात होती. त्याचवेळी उर्मिलाची गाडी कांदिवली पोईसर मेट्रो स्थानकाजवळ पोहोचली आणि चालक गजानन पालचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं. भरधाव वेगात असल्यानं या अपघातामध्ये कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. या अपघाताचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या प्रकरणी निष्काळजीनं वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी समता नगर पोलिसांनी उर्मिला कोठारेचा कारचालक गजानन पाल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. आता याप्रकरणी चालकास अटक करण्यात आली आहे.