पुणे : राज्यातील अनेक भागात गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. थंडीचा जोर कमी झाला असून अरबी समुद्रात वाढलेल्या आर्द्रतेमुळे राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे उत्तरेत धुके आणि थंडीची लाट निर्माण झाली आहे.
उत्तर कोकण व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ वातावरण आहे. कोकण गोव्यात पुढील पाच ते सहा दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात आज व उद्या तर मराठवाड्यात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भात देखील काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुणे व आसपासच्या परिसरात आकाश अंशत: ढगाळ राहून दुपारी किंवा सायंकाळी सामान्यत: ढगाळ राहण्याची व हलक्या ते अति हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील दोन दिवस आकाश मुख्यता निरभ्र राहून दुपारी किंवा सायंकाळी अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
राज्यातील कोकणासह उत्तर महाराष्ट्रात आकाश निरभ्र असेल. विदर्भात वाऱ्याचा वेग सामान्य राहणार आहे. असं असेल तरीही इथे ढगांचे काहीसं सावटच पाहायला मिळेल. नांदेड, बीड, परभणी, सातारा, सांगली, कोल्हापूर, आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये हवेत गारवा अनुभवता येणार आहे. मध्य महाराष्ट्रावर मात्र पुढील 48 तासांमध्ये चक्राकार वाऱ्यांचा प्रभाव दिसणार असून, त्यामुळे थेट कोकण किनारपट्टीवर याचे परिणाम होताना दिसतील. जिथे, पावसाळी ढगांची दाटी असेल.