पुणे : आजपर्यंत केवळ ‘ब्लड मून’, ‘सूपर मून’ व ‘ब्ल्यू मून’ची माहिती होती. आता मात्र ‘ब्लॅक मून’ ही संकल्पना समोर आली आहे. ही घटना लवकरच अनुभवावयास मिळणार आहे. ३० डिसेंबरला या घटनेचा योग राहणार आहे. ‘ब्लॅक मून’ म्हणजे अर्थातच काळा चंद्र, म्हणजे अमावस्या, परंतु काळा चंद्र म्हणून पात्र होण्यासाठी महिन्यातील दुसरी अमावास्या असावी लागते. जेव्हा इंग्रजी महिन्यात दोन अमावास्या येतात, तेव्हा दुसऱ्या अमावास्येच्या चंद्राला ‘काळा चंद्र’ म्हणण्याचा प्रघात आहे.
चंद्र, पृथ्वीभोवती २७.५ दिवसांत एक फेरी पूर्ण करतो. परंतु, एका अमावास्येपासून दुसऱ्या अमावास्येपर्यंतचे व एका पौर्णिमेपासून दुसऱ्या पौर्णिमेपर्यंतचे अंतर हे २९.५ दिवसांचे असते. त्यामुळे इंग्रजी महिना हा ३१ दिवसांचा असेल व पहिली अमावास्या एक तारखेला आली असेल, तर दुसरी अमावास्या ही ३० तारखेला येते. अशा तन्हेने एका महिन्यात दोन अमावास्या येतात. तसेच याचप्रमाणे दोन पौर्णिमाही येतात. जेव्हा इंग्रजी कॅलेंडरच्या एका महिन्यात दोन पौर्णिमा येतात. तेव्हा दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्राला ‘ब्ल्यू मून’ म्हटले जाते. त्याचप्रमाणे जर एका महिन्यात किंवा एका हंगामात दोन अमावास्या आल्या तर दुसऱ्या अमावास्येला ‘ब्लॅक मून’ म्हणण्याचा अलीकडचा प्रघात आहे. यापूर्वी ही घटना ३० जानेवारी २०१६, ३० ऑगस्ट २०१९ व ३० मे २०२२ मध्ये घडली होती. आता यापुढे हा योग ३० ऑगस्ट २०२५ व ३१ ऑगस्ट २०२७ ला येणार आहे. काळा चंद्र म्हणण्याची पद्धत केव्हा सुरू झाली, याबाबत उल्लेख आढळत नाही. परंतु, अशा घटना आल्या की, वेगवेगळ्या अफवा पसरविल्या जातात.
वास्तविक अशा कोणत्याच घटनेचा परिणाम पृथ्वीवर तथा मानवी जीवनावर होत नाही. ३० डिसेंबरचा चंद्र नेहमीसारखाच असेल. यावेळी चंद्रामध्ये कोणताच बदल होणार नाही. सूर्यग्रहणाची स्थिती वगळता, अमावास्येचा कोणताच चंद्र आपणाला दिसत नाही. कारण या वेळेस सूर्याचा प्रकाश चंद्राच्या मागे असतो व अंधारी बाजू पृथ्वीकडे असते. त्यामुळे ३० डिसेंबरला जनतेने उगाचच ‘काळा चंद्र’ शोधण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.