जेजुरी : घरगुती गॅस सिलिंडरमधून अवैधरीत्या गॅस काढून तो व्यावसायिक गॅस सिलिंडरमध्ये भरणाऱ्या चार जणांच्या टोळीचा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईत २६७ गॅस सिलिंडर, गॅस हस्तांतरित करण्याचे मशिन, वजनकाटे व एक चारचाकी वाहन असा सुमारे १२ लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई जेजुरी पोलिस व पुरंदर तालुका पुरवठा विभागाच्या पथकाने केली. या कारवाईमुळे गॅस चोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. याबाबत पुरंदर तालुका पुरवठा निरीक्षक अश्विनी चंद्रकांत वायसे यांनी जेजुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
अभिजित दत्तात्रय बरकडे (वय २२, रा. मोराळवाडी, ता. बारामती), विश्वजीत बारीकराव यमगर (वय २२, रा. पिराळे, ता. माळशिरस जि. सोलापूर), तुकाराम चंद्रकांत खताळ (वय ३०, रा. कापसी, ता. फलटण, जि. सातारा), सत्यवान जगन्नाथ निगडे (वय ५०, रा. कर्नलवाडी, पुरंदर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पांडुरंग राजेंद्र गोफणे (रा. मोराळवाडी, ता. बारामती) याच्या सांगण्यावरून हे काम करत असल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेजुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कर्नलवाडी गुळूचे हद्दीत सत्यवान जगन्नाथ निगडे यांच्या बंद पडक्या पोल्ट्री शेडमध्ये काही व्यक्ती विनापरवाना घरगुती गॅस टाक्यांमधून गॅस काढून तो कमर्शिअल गॅस टाक्यांमध्ये भरत असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे जेजुरी पोलिस आणि पुरंदर तालुका पुरवठा विभागाने संयुक्तरीत्या तेथे छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत २६७ गॅस सिलिंडर, गॅस हस्तांतरित करण्याचे मशिन, वजनकाटे व एक चारचाकी वाहन असा सुमारे १२ लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी पुढील तपास करीत आहेत.