पुणे : बाणेर येथील जमीन मिळकतीवर वारस नोंद करण्यासाठी २० हजार रुपयांची लाचेची मागणी करून तडजोडीअंती १० हजार रुपये स्विकारल्या प्रकरणी तालाठ्यासह खाजगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. ही कारवाई आज (दि. २७) बाणेर तलाठी कार्यालयासमोरील आवारामध्ये केली आहे.
उमेश विठ्ठल देवघडे (वय ३९ वर्ष, पद तलाठी, बाणेर सजा कार्यालय, बाणेर) आणि काळुराम ज्ञानदेव मारणे (वय ३९ वर्ष, दांडेकर पुल, सिंहगड रोड, पुणे) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी एका 42 वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदार यांच्या वडीलांनी मृत्युपत्राद्वारे त्यांची बाणेर येथील असलेली जमीन मिळकत ही तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे करण्याबाबत नोंदणीकृत मृत्युपत्र केले होते. तक्रारदार यांचे वडील २९ ऑगस्ट २०२४ रोजी मयत झाले. त्याप्रमाणे वडीलांचे मृत्युपत्रानुसार त्यांचे नावे असलेली जमीन मिळकतीवर वारस नोंद करण्यासाठी तक्रारदार यांच्या पत्नीने आवश्यक त्या कागदपत्रांसह पाषाण येथील तलाठी कार्यालय अर्ज सादर केला असून, त्याचा पाठपुरावा तक्रारदार करत होते. सदरचा अर्ज सजा बाणेर येथील तलाठी लोकसेवक उमेश देवघडे यांचेकडे प्रलंबित होता.
तक्रारदार हे १८ डिसेंबर २०२४ रोजी बाणेर तलाठी कार्यालयात पत्नीच्या वारस नोंदीच्या अर्जाबाबत चौकशीसाठी उमेश देवघडे यांना भेटले. त्यावेळी त्यांनी वारस म्हणून पत्नीचे नाव लावण्यासाठी प्रथम २० हजार रुपये लाच रक्कम मागितली. त्यावेळी तक्रारदार यांनी ‘एवढे पैसे नाही, थोडे कमी करा’ असे बोलल्यावर लोकसेवक उमेश देवघडे यांनी तक्रारदार यांचेकडे तडजोडीअंती १० हजार रुपयाची लाच मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथे केली होती.
सदर तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष केली असता, लोकसेवक उमेश देवघडे यांनी तक्रारदार यांचेकडे वारस म्हणून पत्नीचे नाव लावण्यासाठी पंचासमक्ष १० हजार रुपयांची लाच मागणी करुन, खाजगी इसम काळुराम मारणे यांनी लोकसेवक उमेश देवघडे यांचे सांगणेवरुन तक्रारदार यांचेकडून स्विकारली असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
दरम्यान, आरोपी लोकसेवक उमेश देवघडे यांचे ताब्यातील कारची तपासणी केली असता, कारमध्ये ३ लाख रुपये रोख मिळून आली. दोघांविरुद्ध बाणेर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलम ७, ७ अ अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, व अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.