-राहुलकुमार अवचट
यवत : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सेवा रस्ता हा वाहतुकीसाठी आहे की पार्किंगसाठी? असा प्रश्न सध्या नागरिक व महामार्गावरून जाणारे वाहनधारक विचारात आहे. पुणे सोलापूर महामार्ग शेजारी असलेला सेवा रस्ता सध्या हॉटेल व्यावसायिकांचे वाहनतळ बनला आहे. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग शेजारी दौंड तालुक्यातील यवत ते स्वामी चिंचोली पर्यंत सेवा रस्ता असून या रस्त्यावर असलेले हॉटेल, मंगल कार्यालय, व्यावसायिक आपली वाहने सेवा रस्त्यावर उभी करत आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा ठरत आहे. त्यामुळे सदर प्रकरणी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरीक करत आहेत.
पुणे सोलापूर रस्त्यावर यवत, भांडगाव, वाखारी, चौफुला, वरवंड, पाटस, कुरकुंम यांसह सेवा रस्त्यावर असलेल्या हॉटेल मध्ये चहा, नाश्ता आणि जेवण करायला आलेल्या नागरीकांनी त्यांची वाहने येथील सेवा रस्त्यावर उभी करत असल्याने सेवा रस्ता हॉटेल व्यावसायिकांनी वाहनतळ बनवला आहे. ही वाहने रस्त्यावर उभी राहिल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. तरीही महामार्ग आणि पोलिसांचे याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.
शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी येथे कायमच सेवा रस्त्यावर वाहने उभी केली जात असल्याने परिसरातील नागरिकांना या रस्त्यावरून प्रवास करताना अडचणीला सामोरे जावे लागत आहेत. वाहन पार्किंग करताना वाहन चालक काळजी घेत नसल्याने या रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तरी सेवा रस्त्यावर पार्किंग करणाऱ्या वाहन चालकांवर व संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरीक करत आहेत.