दौंड : मुलगी पळवून नेवून तिचा मुलाशी विवाह केल्याचा राग मनात धरून चार जणांनी दाम्पत्यांवर कुऱ्हाडीने वार केल्याची घटना घडली आहे. ही घटना मळद (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीतील घागरेवस्ती परिसरात असलेल्या कॅनॉलजवळ गुरुवारी (ता.26) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या हल्ल्यात पती, पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. तर चार जणांवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक भिकाजी खामगळ (वय-50) व अर्चना अशोक खामगळ (वय 45, दोघेही रा. खामगळवाडी, ता.बारामती, जि. पुणे) अशी जखमी झालेल्या पती पत्नीची नावे आहेत. तर लक्ष्मण सखाराम घागरे, भानुदास घागरे, देवीदास घागरे व सखाराम घागरे (सर्व रा. घागरेवस्ती मळद, ता.दौंड जि पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अर्चना खामगळ यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अर्चना खामगळ यांच्या मुलीचा विवाह आरोपींच्या नातेवाईकांशी सन 2020 साली झाला होता. यावेळी फिर्यादी यांचा मुलगा सुमीत हा बहिणीला भेटण्यासाठी मळद येथील घागरेवस्तीवर जात होता. तेव्हा सुमीत व फिर्यादी यांचे नातेवाईक असलेले लक्ष्मण घागरे यांची मुलगी आरती यांच्याशी ओळख झाली होती. सुमीत व आरती यांच्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत अन् मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. सुमीतने आरती सोबत लग्न करावयाचे आहे. असे फिर्यादी यांना सांगितले.
फिर्यादी अर्चना खामगळ व आशोक खामगळ यांनी सुमीतचे आरती सोबत विवाह व्हावे. अशी मागणी आरतीचे वडील लक्ष्मण घागरे यांच्याकडे केली होती. तेव्हा लक्ष्मण घागरे यांनी लग्नासाठी नकार दिला होता. त्यामुळे फिर्यादी यांनी विषय सोडून दिला होता. काही दिवसानंतर सुमीतला आरतीने फोन करून सांगितले की, घरचे हातपाय तोडण्याची ध़मकी देत आहेत. तेव्हा तू येवून मला घेवून जा’ त्यानंतर सुमीत आरतीला घेऊन आला. आणि सुमीत व आरतीने आळंदी येथे जाऊन विवाह केला. त्यानंतर सखाराम घागरे यांनी फिर्यादी यांच्या मुलीच्या घरी जावून ” तुझ्या भावाने आमची मुलगी नेली काय, आत बघा तुमचा सगळ्यांचा कसा काटा काढतो? अशी वारंवार धमकी दिली आहे.
दरम्यान, फिर्यादी अर्चना व त्यांचे पती अशोक खामगळ हे मुलीला भेटण्यासाठी मळद येथे गुरुवारी (ता.26) गेले होते. मुलीला भेटल्यानंतर खामगळ दाम्पत्य हे दुचाकीवरून माघारी घरी चालले होते. तेव्हा आरोपींनी फिर्यादी यांच्या स्कुटरला दुचाकीने जोरदार धकड दिली. यावेळी फिर्यादी व त्यांचे पती दोघेही खाली पडले. त्यानंतर चारही आरोपींनी दोघांवर कुऱ्हाडीने वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात खामगळ दाम्पत्य हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर दौंडमधील विघ्नहर्ता हॉस्पीटल मध्ये उपचार सुरु आहेत.
याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास दौंड पोलीस करीत आहेत.