मुंबई : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यावर शनिवारी (28 डिसेंबर) अंत्यसंस्कार होणार आहेत. आपल्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत त्यांनी भारताला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून त्यांनी देशातील गोरगरीब, दीनदुबळ्यांची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान, मनमोहन यांच्या निधनानंतर त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला जात आहे. अशातच मनमोहन सिंग पतंप्रधान असताना त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी असणारे माजी आयपीएस अधिकारी असीम अरूण यांनी त्यांची एक खास आठवण सांगितली आहे. प्रत्येकाला मनमोहन सिंग यांचा अभिमान वाटेल अशीच ही एक आठवण आहे.
असीम अरुण नेमकं काय म्हटले?
असीम अरूण हे माजी आयपीएस अधिकारी आहेत. सध्या ते उत्तर प्रदेशच्या समाजकल्याण विभागाचे राज्यमंत्री आहेत. आयपीएस अधिकार असताना 2004 साली ते तीन वर्षे मनमोहन सिंग यांचे अंगरक्षक होते. विशेष म्हणजे ते मनमोहन सिंग यांच्या सर्वाधिक जवळ असायचे. त्यांनीच एक्सवर एक पोस्ट करून मनमोहन सिंग यांची जुनी आठवण सांगितली आहे. सोबत त्यांनी मनमोहन सिंग यांचा एक फोटो सुद्धा शेअर केला आहे.
पोस्टमध्ये नेमकं काय आहे.
“मी 2004 साली साधारण तीन वर्षे मनमोहन सिंग यांचा अंगरक्षक होतो. पंतप्रधानांच्या एसपीजी सुरक्षा व्यवस्थेत क्लोज प्रोटेक्शन टीम असते. ही टीम पंतप्रधानांच्या सर्वात जवळ असते. याच टीमचे नेतृत्त्व करण्याची संधी मला मळाली होती. या टीममध्ये एआयजी सीपीटी अशी एक व्यक्ती असते जी पंतप्रधानांच्या नेहमी सोबत असते. ही व्यक्ती पंतप्रधानांपासून कधीच दूर जाऊ शकत नाही. जेव्हा-जेव्हा पंतप्रधानांसोबत एकच अंगरक्षक असतो, तेव्हा याच व्यक्तीला त्यांच्यासोबत जाता येते. ही जबाबदारी माझ्यावर होती,” अशी माहिती असीम अरुण यांनी दिली.
मैं 2004 से लगभग तीन साल उनका बॉडी गार्ड रहा। एसपीजी में पीएम की सुरक्षा का सबसे अंदरुनी घेरा होता है – क्लोज़ प्रोटेक्शन टीम जिसका नेतृत्व करने का अवसर मुझे मिला था। एआईजी सीपीटी वो व्यक्ति है जो पीएम से कभी भी दूर नहीं रह सकता। यदि एक ही बॉडी गार्ड रह सकता है तो साथ यह बंदा… pic.twitter.com/468MO2Flxe
— Asim Arun (@asim_arun) December 26, 2024
मला या बीएमडबल्यूमधून जाणं आवडत नाही…
तसेच,”डॉ. मनमोहन सिंग यांना मारुती 800 ही एक कार होती. ते पंतप्रधान असताना चमचम करणाऱ्या बीएमडब्ल्यूच्या मागे ही कार उभी केली जायची. ही कार पाहून मनमोहन सिंग मला नेहमी सांगायचे की, असीम मला या बीएमडबल्यूमधून जाणं आवडत नाही. माझी गाडी तर मारूती- 800 आहे. त्यांच्या या बोलण्यानंतर तुमच्या सुरक्षेसाठी ही काळ्या रंगाची बीएमडब्ल्यू कार आहे. या कारमध्ये सुरक्षेच्या वेगवेगळ्या सुविधा आहेत, असे मी त्यांना सांगायचे,” अशी आठवण असीम यांनी सांगितली.
माझी कार तर मारूती-800…
“मात्र मनमोहन सिंग यांचा ताफा जेव्हा त्यांच्या मारूती कारच्या समोरून निघायचा तेव्हा ते नेहमीच त्यांच्या कारकडे डोळे भरून पाहायचे. जणूनकाही मी मध्यमवर्गीय आहे. सामान्य लोकांची चिंता करणे हे माझे काम आहे. करोडो रुपयांची गाडी तर पंतप्रधानपदाची आहे. माझी कार तर मारूती-800 आहे, असं जणू ते स्वत:ला सांगायचे,” अशी आठवण ससीम अरूण यांनी सांगितली.